सामनानिश्चितीच्या सावटाखाली असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मंगळवार धक्कातंत्राचा ठरला. दुखापतीतून सावरलेला राफेल नदाल नव्या वर्षांत दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक होता. मात्र फर्नाडो व्हर्डास्कोने त्याचे स्वप्न धुळीस मिळवले. महिलांमध्ये द्वितीय मानांकित सिमोन हालेप आणि माजी विजेती व्हीनस विल्यम्स यांनाही सलामीच्या लढतीतूनच गाशा गुंडाळावा लागला.
चार तासांपेक्षा जास्त वेळ रंगलेल्या चुरशीच्या मुकाबल्यात स्पेनच्याच फर्नाडा व्हर्डास्कोने नदालवर ७-६, (८-६), ४-६, ३-६, ७-६ (७-४), ६-२ असा विजय मिळवला. ग्रँड स्लॅम स्पर्धेत, सलामीच्या लढतीत गारद होण्याची नदालची ही केवळ दुसरी वेळ आहे. दुखापतींनी घेरलेल्या आणि खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या नदालच्या कारकीर्दीतील हा सगळ्यात मानहानीकारक पराभवांपैकी एक आहे. २०१३ मध्ये विम्बल्डन स्पर्धेत नदालला सलामीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. लाल मातीचा राजा अशी बिरुदावली मिळवलेल्या नदालला फ्रेंच खुल्या स्पर्धेत नमवण्याची किमया नोव्हाक जोकोव्हिचने केली. त्या वेळीच नदालचे संस्थान खालसा झाल्याची चर्चा सुरू झाली होती. २०१४ फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदानंतर नदालला ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावता आलेले नाही. ‘हा पराभव पचवणे कठीण आहे; परंतु हार टाळण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजचा दिवस माझा नव्हता. खेळात या गोष्टी घडतातच. सातत्याने सराव करणे एवढेच माझ्या हाती आहे’, अशा शब्दांत नदालने आपल्या भावना व्यक्त केल्या. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा नदालसाठी नेहमीच अवघड गड राहिला आहे. २००९ मध्ये रॉजर फेडररला नमवत नदालने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याच स्पर्धेत व्हर्डास्कोविरुद्ध जिंकण्यासाठी नदालला पाच तासांपेक्षा जास्त वेळ संघर्ष करावा लागला होता. २०१० मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे नदालला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. २०११ मध्ये नितंबाच्या दुखापतीमुळे नदाल लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही आणि उपांत्यपूर्व फेरीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
मंगळवारी झालेल्या मुकाबल्यात व्हर्डास्को पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये ०-२ असा पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर सलग सहा गुणांची कमाई करीत व्हर्डास्कोने नदालविरुद्धच्या १७ लढतींमध्ये तिसरा विजय साकारला. जागतिक क्रमवारीत ४५ व्या स्थानी असलेल्या व्हर्डास्कोने तब्बल ताकदवान ४१ फोरहँडच्या फटक्यांसह नदालला निष्प्रभ केले.
‘पाचव्या सेटमध्ये खेळताना हा उपांत्य फेरीचा सामना असल्यासारखे मला वाटले. विजयाच्या इतक्या समीप येऊन मला हरायचे नव्हते. माझी सव्‍‌र्हिस भेदक होती, फोरहँडचे फटकेही अचूक होते. मी कमीत कमी चुका केल्या. नदालसारख्या मातब्बर खेळाडूला नमवल्याचे समाधान आहे’, असे व्हर्डास्कोने सांगितले.
अन्य लढतींमध्ये अँडी मरेने अलेक्झांडर व्हरेवला ६-१, ६-२, ६-३ असे नमवत विजयी सलामी दिली. बरनार्ड टॉमिकने डेव्हिड इस्टोमनवर ६-७ (४-७), ६-४, ६-४, ६-४ अशी मात केली.
महिलांमध्ये जोहाना कोन्टाने व्हीनस विल्यम्सवर ६-४, ६-२ असा सरळ सेट्समध्ये मात करत खळबळजनक विजयाची नोंद केली. दुखापतीतून सावरलेल्या व्हिक्टोरिया अझारेन्काने अ‍ॅलिसन व्हॅन युटव्हॅनकचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवत दणदणीत विजय साकारला. बिगरमानांकित आणि पात्रता फेरीचा अडथळा पार करून आलेल्या चीनच्या शुआई झांगने द्वितीय मानांकित सिमोन हालेपवर ६-४, ६-३ असा विजय मिळवत धक्कादायक विजय मिळवला.