नदाल, गॅस्क्वेटची उपांत्य फेरीत धडक
अझारेन्का, पेनेन्टाची आगेकूच
गेल्या वर्षी गुडघ्याच्या दुखापतीने गंभीर स्वरूप धारण केल्याने नदाल अध्र्यापेक्षा जास्त हंगाम टेनिस कोर्टपासून दूरच राहिला. प्रदीर्घ कालावधीची त्याची अनुपस्थिती आणि दुखापतीच्या गंभीर स्वरूपामुळे नदाल आता परतत नाही, अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र विजिगीषू वृत्तीचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या नदालने पुनरागमन केले. तो नुसता परतला नाही, तर त्याच्या लाडक्या लाल मातीवरचे फ्रेंच स्पर्धेचे जेतेपद पटकावून त्याने आपण अद्यापही आंतरराष्ट्रीय टेनिसकरिता सिद्ध असल्याचे दाखवून दिले. मात्र १५ दिवसांत विम्बल्डनच्या हिरवळीवर त्याला सलामीच्या लढतीतच अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. ‘लाल मातीचा राजा’ हिरवळीवर मात्र भुईसपाट अशा टीका-टोमण्यांचा त्याला सामना करावा लागला. या पराभवामुळे नदाल खडाडून जागा झाला. अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत नदालचा विजयरथ आता उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे.
काही तासांपूर्वी बलाढय़ रॉजर फेडररचे साम्राज्य खालसा करणाऱ्या देशबंधू आणि मित्र टॉमी रॉब्रेडोचे आव्हान नदालने अक्षरश: भिरकावून दिले. फेडररला चीतपट करणाऱ्या रॉब्रेडोचा नदालने ६-०, ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. मात्र या विजयासह नदालची यंदाच्या वर्षांतील हार्ड कोर्टवरची आणि एकूणच कामगिरी अचंबित करणारी आहे. या वर्षी हार्ड कोर्टवर नदालने २० पैकी २० लढतींत विजय मिळवला आहे, तर वर्षभरात सर्व प्रकारच्या लढतींमध्ये नदालची कामगिरी ५८-३ असे प्रचंड वर्चस्व गाजवणारी आहे. सध्याचा त्याचा झंझावात बघता अँडी मरे आणि नोव्हाक जोकोव्हिच या दोघांना त्याला नमवण्यासाठी विशेष कामगिरी करावी लागणार आहे.
केवळ एक तास आणि ४० मिनिटे चाललेल्या लढतीत नदालने रॉब्रेडोला एकही ब्रेकपॉइंट दिला नाही. ताकदवान सव्‍‌र्हिस, फोरहँड, बॅकहँडवरचे जबरदस्त प्रभुत्व आणि कोर्टवरचा सर्वागीण वावर, ही नदालच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. उपांत्य फेरीत नदालचा मुकाबला फ्रान्सच्या रिचर्ड गॅसक्वेटशी होणार आहे. ‘‘उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने आनंद झाला आहे. अमेरिकन खुल्या स्पर्धेतलं माझं सर्वोत्तम टेनिस खेळलो. प्रत्येक सामन्यागणिक समृद्ध होत असल्याची भावना सुखावणारी आहे,’’ असे नदालने सांगितले.
अन्य लढतींमध्ये फ्रान्सच्या रिचर्ड गॅसक्वेटने स्पेनच्या डेव्हिड फेररवर मात करत पहिल्यांदाच अमेरिकन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होण्याचा मान मिळवला. गॅस्क्वेटने फेररला ६-३, ६-१, २-६, ६-४ असे नमवले.

१९९९मध्ये सेड्रिक पिओलिननंतर अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणारा गॅस्क्वेट पहिला फ्रेंच टेनिसपटू ठरला आहे; परंतु नदालविरुद्धच्या दहाही लढतींत गॅसक्वेट पराभूत झाला आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत याआधी २००७मध्ये गॅसक्वेटने विम्बल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.
महिलांमध्ये व्हिक्टोरिया अझारेन्का आणि फ्लाव्हिआ पेनेन्टा यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले. द्वितीय मानांकित बेलारुसच्या २४ वर्षीय अझारेन्काने स्लोव्हाकियाच्या डॅनियला हन्तुचोव्हावर ६-२, ६-३ अशी मात केली.
फ्लाव्हिआ पेनेन्टाने इटलीच्याच रॉबर्टा व्हिन्सीवर ६-४, ६-१ असा विजय मिळवला आणि पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. पेनेन्टाने या स्पर्धेत अद्याप एकही सेट गमावलेला नाही. ८३व्या मानांकित पेनेन्टाला उपांत्य फेरीत अझारेन्काचा सामना करावा लागणार आहे.

सानिया-झेंग उपांत्य फेरीत
न्यूयॉर्क : सानिया मिर्झा आणि तिची चीनची साथीदार जि झेंग जोडीने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्य फेरी गाठली आहे. या जोडीने सरळ सेट्समध्ये चौथ्या मानांकित चायनीज तैपेईच्या स्यू-वेई सिई आणि चीनच्या शाअुई पेंग जोडीवर ६-४, ७-६ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांचा मुकाबला आठव्या मानांकित अ‍ॅशलेह बार्टी आणि कॅसे डेलअ‍ॅक्वा जोडीशी होणार आहे. पहिल्या सेटमध्ये मिळालेल्या एकमेव ब्रेकपॉइंटद्वारे सानिया-झेंग जोडीने सेट नावावर केला. दुसऱ्या सेटमध्ये सिई-पेंग जोडीने संघर्ष केला मात्र सानिया-झेंग जोडीने वर्चस्व राखत दुसऱ्या सेटसह सामन्यावर कब्जा केला. अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची सानियाची ही पहिलीच वेळ असणार आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेसारख्या मोठय़ा स्पर्धाच्या उपांत्य फेरीत खेळण्याची तिला चौथ्यांदा संधी मिळणार आहे. दुहेरी प्रकारात भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवणाऱ्या सानियाने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये महिला दुहेरी प्रकारात अंतिम चारमध्ये धडक मारण्याची किमया केली आहे.