तब्बल १४व्यांदा फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत; त्सित्सिपासची आगेकूच

पॅरिस :‘लाल मातीचा सम्राट’ असे बिरुद मिरवणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालला यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत २०१९नंतर प्रथमच सेट गमवावा लागला. परंतु अनुभवाच्या बळावर तिसऱ्या मानांकित नदालने झोकात पुनरागमन करून सर्वाधिक १४व्यांदा फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ३५ वर्षीय नदालने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाच्या १०व्या मानांकित दिएगो श्वाट्र्झमनवर ६-३, ४-६, ६-४, ६-० अशी चार सेटमध्ये मात केली. या विजयासाठी नदालला दोन तास आणि ४५ मिनिटे संघर्ष करावा लागला. आता शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य लढतीत त्याच्यासमोर नोव्हाक जोकोव्हिच विरुद्ध मॅटिओ बॅरेट्टिनी यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

नदालने २०१९च्या अंतिम सामन्यात दुसरा सेट गमावला होता. त्यानंतर त्याने तब्बल ३६ सेट जिंकले. परंतु श्वाट्र्झमनने कडवा प्रतिकार केल्यामुळे नदालला यावेळी सेट गमवावा लागला. २०१८मध्येही श्वाट्र्झमननेच नदालच्या सेटचा विक्रम मोडीत काढला होता. नदालने २०१६ ते २०१८दरम्यान ३८ सेट जिंकले होते.

तत्पूर्वी, मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अन्य उपांत्यपूर्व सामन्यात पाचव्या मानांकित त्सित्सिपासने रशियाच्या दुसऱ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला ६-३, ७-६ (७-३), ७-५ असे पराभूत केले. हा सामना दोन तास आणि १९ मिनिटे रंगला. उपांत्य लढतीत त्सित्सिपासची जर्मनीच्या सहाव्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हशी गाठ पडेल. झ्वेरेव्हने स्पेनच्या डेव्हिडोव्हिच फोकिनावर ६-४, ६-१, ६-१ असा सहज विजय मिळवला.

१०५ नदालचा हा फ्रेंच स्पर्धेतील १०५वा विजय ठरला. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत फक्त दोनच (२००९ आणि २०१५मध्ये) सामने गमावले आहेत.

सर्वाधिक १३ जेतेपदे नावावर असलेल्या नदालला आतापर्यंत एकदाही फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागलेला नाही.

त्सित्सिपासने कारकीर्दीत चौथ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र यापूर्वी तिन्ही वेळा त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही.