महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कर्णधारपदाचा प्रश्न तूर्तास जरी सुटला असला तरी उपकर्णधार कोण असेल हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. अजिंक्य रहाणे किंवा रविचंद्रन अश्विन यांच्यापैकी एकाची उपकर्णधार पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
‘‘संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती आणि संघ संचालक रवी शास्त्री याबाबत कोणती भूमिका घेणार ते उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या तरी रहाणे आणि अश्विन यांना संधी आहे,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.
रहाणे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघातील स्थान टिकवून असल्यामुळे त्याच्या नावाचा प्राधान्याने विचार होत आहे. परंतु अनुभवाचा विचार करता अश्विनचे नाव पुढे येते.
कोहली आक्रमक आहे, तर रहाणे शांत, नेमका हाच गुण त्याच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. याशिवाय रहाणेने १३ कसोटी सामन्यांत तीन शतकांसह १०२६ धावा केल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
अश्विनच्या खात्यावर २३ कसोटी सामने जमा आहेत. या सामन्यांत त्याने ११४ बळी आणि ९५६ धावा केल्या आहेत. परंतु परदेशात मात्र त्याचे संघातील स्थान डळमळीत असते, ही वस्तुस्थिती आहे. सध्याच्या घडीला  तिरंगी एकदिवसीय स्पर्धा आणि आयसीसी विश्वचषक ही दोनच आव्हाने भारतीय संघासमोर आहेत. बीसीसीआयच्या कार्यप्रणालीनुसार देशांतर्गत मालिकेसाठी अधिकृत उपकर्णधार नियुक्त केला जात नाही. परंतु परदेशात मालिका खेळताना मात्र उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाते.