ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त ३६ धावांत गारद झाला. पहिल्या डावात विराट कोहलीचं अर्धशतक आणि पुजारा-रहाणेची संयमी खेळी यामुळे भारताने सामन्यावर वर्चस्व गाजवलं होतं. तरीही अजिंक्य रहाणेने ज्या पद्धतीने विराट कोहलीला रनआऊट केलं ते पाहता अनेकांनी रहाणेवर टीका केली.

अवश्य वाचा – लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने उडवली भारताची खिल्ली, म्हणाला…

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही अजिंक्य आणि विराटमध्ये झालेल्या या गोंधळावरुन रहाणेला टीकेचा धनी केलं आहे. “अजिंक्यने ज्या पद्धतीने विराटला धावबाद केलं ते एका पद्धतीने त्याला मारल्यासारखंच होतं. जर कोहली त्यावेळी मैदानात टीकला असता तर त्याने १५०-२०० धावा केल्या असत्या आणि भारताकडे अधिक चांगली चांगली आघाडी असती. दुसऱ्या डावात भारताकडे पुनरागमन करायची चांगली संधी होती.”

अवश्य वाचा – भारतीय संघ पुनरागमन करु शकतो, पण…; शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया

याच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारताने पहिला डाव चांगल्या पद्धतीने खेळून काढला. मग दुसऱ्या डावात नेमकं असं काय झालं तेच कळत नाही. भारतीय फलंदाज पूर्णपणे वेगळ्या रणनितीने मैदानात उतरलेले पहायला मिळाले. भारतीय फलंदाजांनी अक्षरशः हेजलवूड आणि कमिन्स यांच्यासमोर शरणागती पत्करली. कसोटी मालिकेची अश्या पद्धतीने सुरुवात होणं ही खरंच लाजीरवाणी बाब आहे. आगामी काळात भारत हा पराभव विसरु शकणार नाही, अख्तरने आपलं मत मांडलं. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली माघारी परतणार असल्यामुळे अजिंक्य रहाणे उर्वरित तीन कसोटी सामन्यांत भारताचं नेतृत्व करणार आहे.