मनू भाकरला रौप्यपदकावर समाधान

वृत्तसंस्था, भोपाळ

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतने ६३व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात बुधवारी सुवर्णपदक पटकावले. कनिष्ठ गटातील सुवर्णपदक विजेत्या मनू भाकरला वरिष्ठ गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या वरिष्ठ गटात राहीने ५८९ गुण मिळवले, तर अंतिम फेरीत ४१ गुण मिळवले. मनूला प्राथमिक फेरीत ५८२ आणि अंतिम फेरीत ३२ गुण मिळाले. राहीने अंतिम फेरीत नऊ गुणांच्या फरकाने सुवर्णपदकावर वर्चस्व गाजवले. या गटातील कांस्यपदक महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलला मिळाले. प्राथमिक फेरीत तिला ५७५ आणि अंतिम फेरीत २७ गुण मिळाले. महाराष्ट्राला १७३८ गुणांसह सांघिक सुवर्णपदक मिळाले, तर हरियाणाला (१७०९ गुण) दुसरे स्थान मिळाले.

म्युनिच (जर्मनी) येथे मे महिन्यात झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना राहीने टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातील एक स्थान निश्चित केले होते.