भारतीय कुस्ती महासंघाकडून चौघांवर तात्पुरत्या बंदीची कारवाई

शिस्तभंगाचा बडगा उगारत भारतीय कुस्ती महासंघाने बबिता कुमारी, गीता फोगट, सुमित आणि राहुल आवारे (पुरुष ५७ किलो फ्रिस्टाइल) या चौघांवर तात्पुरती बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांचे रिओ ऑलिम्पिकचे स्वप्न दुर्दैवीरीत्या संपुष्टात आले आहे.

‘‘चौघांवर तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घालण्यात आली असून, त्यामुळे ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा लाभलेल्या इस्तंबूल येथे होणाऱ्या स्पध्रेत त्यांना सहभागी होता येणार नाही,’’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे सहसचिव विनोद तोमर यांनी सांगितले. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रतेचा दर्जा असलेली शेवटची स्पर्धा म्हणजे दुसरी जागतिक अजिंक्यपद पात्रता कुस्ती स्पर्धा ही इस्तंबूल (टर्की) येथे ६ ते ८ मे या कालावधीत होणार आहे.

उलानबाटार (मोंगोलिया) येथे झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद पात्रता कुस्ती स्पध्रेतील ५३ किलो वजनी गटाची रीपीचेज लढत खेळण्यापासून बबिताला मज्जाव करण्यात आला, तर ५८ किलोमध्ये गीताने दुखापतीमुळे माघार घेतली. पुरुषांच्या १२५ किलो फ्रिस्टाइल गटात सुमितला ऑलिम्पिक पात्रतेची संधी होती. मात्र तोही दुखापतीमुळे खेळू शकला नाही.

‘‘जागतिक स्पध्रेत चार कुस्तीपटूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तुम्हाला दुखापतीमुळे लढत खेळता येत नसेल, तर अधिकृतपणे माघार घेण्याची प्रक्रिया असते. मात्र खेळाडूंच्या भूमिकेमुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे. जागतिक संघटनेनेही या चौघांची पुढील स्पध्रेतून हकालपट्टी केली आहे,’’ अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. या चौघांना आता १५ मेपर्यंत स्पष्टीकरण देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यानंतर शिस्तपालन समिती त्यांच्या शिक्षेची सुनावणी करणार आहे.

‘‘बबिता आणि गीता या दोघींनाही टर्कीतील स्पध्रेसाठी जाता येणार नाही. त्यांच्या जागी ललिता आणि साक्षी मलिक स्पध्रेत सहभागी होणार आहेत. याचप्रमाणे पुरुषांच्या गटांमध्येही अन्य कुस्तीपटू भारताचे प्रतिनिधित्व करतील,’’ असे तोमर यांनी सांगितले.

भारताच्या फ्रिस्टाइल आणि ग्रीको-रोमन प्रकारातील कुस्तीपटूंसाठी विशेष शिबीर जॉर्जिया येथे झाले. मात्र या प्रशिक्षणासाठी निवड झालेला राहुल आवारे आणि त्याचे अन्य सहकारी व्हिसाच्या समस्येमुळे तिथे जाऊ शकले नव्हते.

‘‘राहुल आवारेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मोंगोलिया आणि टर्कीतील स्पध्रेत भारतीय कुस्ती महासंघ आपल्याला सहभागी होऊ देणार नाही, या भावनेने आवारेने जॉर्जियाचे प्रशिक्षण टाळले,’’ असे सूत्रांनी सांगितले.