राहुल आवारे, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू

प्रशांत केणी

उत्तरेकडील राज्यांमध्ये यशाला प्रेरक ठरणाऱ्या क्रीडा प्रोत्साहन प्रणालीचा महाराष्ट्राने अवलंब करायला हवा. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात कुस्तीमधील गुणवत्ता आहे. फक्त त्याला योग्य पाठबळ मिळाले, तर महाराष्ट्रसुद्धा कुस्तीमध्ये अग्रेसर होईल आणि स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक पदकाची पुनरावृत्ती येथील मल्ल करू शकतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारेने व्यक्त केला.

नूर-सुलतान (कझाकस्तान) येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत राहुलने ५७ किलो वजनी गटात रॅपिचेजची संधी साधून भारताला कांस्यपदक जिंकून दिले. या यशाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली खास बातचीत-

* जागतिक स्पर्धेतील यशाविषयी काय सांगशील?

माझ्यासाठी तर हे यश अत्यंत आनंदाचे आहे. परंतु जागतिक पदक जिंकणारा पहिला महाराष्ट्राचा कुस्तीपटू ठरलो, याचा अभिमान वाटतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत मिळवलेल्या पदकांच्या तुलनेत हे खूप मोठे आहे.

* जागतिक स्पर्धेत किती खडतर आव्हान होते?

या स्पर्धेआधी मी दोनदा जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु त्यात मला अपयश आले होते. पण या स्पर्धेआधी काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलो. त्यातील कामगिरीच्या बळावर जागतिक क्रमवारीत सुधारणा झाली. त्यामुळे सामन्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा मला फायदा झाला. याचप्रमाणे परदेशातील विशेष सराव सत्रांचा अनुभव माझ्या पथ्यावर पडला. त्यामुळेच हे आव्हान मी पेलू शकलो.

* राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपासून कारकीर्दीतील स्वप्नवत मजल मारली जात आहे, याचे तू विश्लेषण कसे करशील?

आता मी २७ वर्षांचा असताना ही कामगिरी करीत आहे, याचा अर्थ याआधीसुद्धा मला हे यश मिळवता आले असते. परंतु दुखापती, निवड चाचणी अभाव अशा असंख्य अडचणींमुळे माझ्या कारकीर्दीचे नुकसान झाले. पण राष्ट्रकुलमधील प्रतिष्ठेचे पदक माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यानंतर जितक्या स्पर्धा खेळत आलो आहे, त्या प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकले आहे.

* भारताला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणाऱ्या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या महाराष्ट्रासाठी या यशाचे महत्त्व काय आहे?

खाशाबा जाधव यांच्या ऐतिहासिक कामगिरीपासून कुस्तीमधील महाराष्ट्राचे स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम अधोरेखित होत होते. १९७२ नंतर काही प्रमाणात महाराष्ट्राच्या कुस्तीची अधोगती सुरू झाली. आता गेल्या काही वर्षांत पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. हरयाणा, दिल्लीसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये खेळाडूंना सरकारी नोकऱ्या, आर्थिक इनाम, सुविधा आणि पुरस्कर्ते यासाठी उत्तम वातावरण निर्माण केले. त्याचे सकारात्मक परिणाम मग तिथे दिसून आले. महाराष्ट्राची तुलना केल्यास दिसणारी तफावत दूर करणे आवश्यक आहे.

* २०२०च्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आव्हानाविषयी काय सांगशील?

माझ्या वजनी गटासाठी जागतिक ऑलिम्पिक पात्रता भारताने आधीच साधली आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघ काय निर्णय देईल, यावर माझे ऑलिम्पिकचे भवितव्य अवलंबून आहे. याशिवाय ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा असलेल्या दोन महत्त्वाच्या स्पर्धा व्हायच्या आहेत. त्यासाठी गांभीर्याने तयारी सुरू आहे.