कोरियाच्या किमवर सरशी; हरयाणाच्या अमितची ७४ किलो वजनी गटात रौप्यपदकाला गवसणी

शियान (चीन) : आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवशीसुद्धा वर्चस्व कायम राखले आहे. अमित धानकरने रौप्यपदक, तर राष्ट्रकुल विजेत्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने कांस्यपदकाची कमाई केली.

२०१३मध्ये ६६ किलो गटात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमितला ७४ किलो फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या डॅनियार कैसानोव्हाने त्याचा ५-० असा पराभव केला.

हरयाणाच्या २८ वर्षीय अमितने पात्रता फेरीत इराणच्या अश्घर नोखोडिलारिमीवर २-१ असा निसटता विजय मिळवला. मग उपांत्यपूर्व सामन्यात जपानचा युही फुजिनामी जखमी झाल्यामुळे त्याला पुढे चाल मिळाली. त्यानंतर उपांत्य सामन्यात अमितने किर्गिझस्तानच्या इगिझ डहाकबेकोव्हाला ५-० असे नमवले.

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहुलने ६१ किलो फ्रीस्टाइल प्रकारातील कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या जिनचेओल किमचा ९-२ असा पाडाव केला.

पात्रता सामन्यात राहुलने उझबेकिस्तानच्या जाहोंगिर मिर्झाला तांत्रिक गुणाआधारे १०-० असे नमवले. मग उपांत्यपूर्व सामन्यात २७ वर्षीय राहुलला इराणच्या बेहनाम इशाघ एहसानपूरकडून पराभव पत्करावा लागला. परंतु एहसानपूर अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे राहुलला ‘रेपेचेज’ सामन्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने तांत्रिक गुणांआधारे थायलंडच्या सिरिपाँग जुंपाकामला १२-१ असे नमवले.

५ भारताने एक रौप्य आणि एक कांस्यपदकासह एकूण पदकसंख्या पाचपर्यंत वाढवली आहे. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. मंगळवारी बजरंग पुनियाने (६५ किलो) सुवर्ण, तर परवीन राणा (७९ किलो) आणि सत्यवर्त कडियान (९७ किलो) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.