जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांनी आतापर्यंत आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारेने ६१ किलो वजनी गटात अमेरिकेचा प्रतिस्पर्धी टेलर ली ग्राफवर ११-४ ने मात करत कांस्यपदकाची कमाई केली. यंदाच्या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं पदक ठरलं आहे. याआधी २०१३ साली भारतीय मल्लांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ३ पदकं पटककावली होती.

कांस्यपदकाच्या सामन्यात राहुलने संपूर्णपणे आपलं वर्चस्व राखलं होतं. आतापर्यंत राहुलने आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दोन कांस्य आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतलं कांस्यपदक ही राहुलची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.

अवश्य वाचा –  World Wrestling Championship : दुखापतीमुळे भारताचं सुवर्णपदक हुकलं, दिपक पुनियाला रौप्यपदकावर समाधान

सामन्याच्या सुरुवातीला अमेरिकन प्रतिस्पर्ध्याने राहुलच्या दोन्ही पायांवर हल्ला करत आक्रमक सुरुवात करत २ गुण मिळवले. मात्र राहुलने आपलं लक्ष विचलीत न होऊ देता, दमदार पुनरागमन करत पुढच्या काही मिनीटांमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. यानंतरही ग्राफने राहुलच्या पायांना लक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येकवेळी राहुल अमेरिकन प्रतिस्पर्ध्याच्या कचाट्यातून यशस्वीपणे सुटला. काही मिनीटांनंतर राहुलने आपला मराठी मातीतला खेळ दाखवत सामन्यात १०-२ अशी मोठी आघाडी घेतली. ग्राफने राहुलला झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र राहुलने ११-४ च्या फरकाने कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं.