16 January 2019

News Flash

हे यश पाहण्यासाठी बिराजदार पाहिजे होते!

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारेची भावनिक प्रतिक्रिया

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारेची भावनिक प्रतिक्रिया

कुस्तीमध्ये मी उभा आहे तो केवळ हरिश्चंद्र तथा मामा बिराजदार यांच्यामुळेच. मी राष्ट्रकुल क्रीडा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळवावे हे त्यांचे स्वप्न होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक आज मी येथे जिंकले, मात्र हे यश पाहण्यासाठी मामा हयात नाहीत. हे सोनेरी यश मी त्यांनाच अर्पण करीत आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया राहुल आवारेने व्यक्त केली.

बीड येथील २६ वर्षीय राहुलला २०१० व २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. रिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याला पात्रता पूर्ण करता आली नव्हती. जागतिक स्तरावर पुन्हा नावलौकिक मिळवण्यासाठी तो यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत आत्मविश्वासाने उतरला होता. सोनेरी कामगिरीबाबत तो म्हणाला, ‘‘अगोदरच्या दोन राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भाग घेता आला नव्हता. याचेही दु:ख मला वाटत होते. तसेच रिओ ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करता आली नाही, याची सतत बोच माझ्या मनात होती. जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीट निश्चित झाले, तेव्हाच अजिंक्यपद मिळवण्याचे ध्येय मी ठरवले होते.’’

सुवर्णपदकाचे श्रेय कोणाला देशील, या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाला, ‘‘मामा हे माझे प्रेरणास्थान होते. त्यांच्याकडून मी कुस्तीचे बाळकडू शिकलो. त्यानंतर काका पवार व गोविंद पवार यांनी माझ्या कारकीर्दीला आकार दिला. त्यांचाही माझ्या सुवर्णपदकात वाटा आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक कुलदीप सिंग यांचेही मला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. रेल्वेमध्ये मी नोकरी करतो. तेथील सर्व वरिष्ठ अधिकारी व सहकारी यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. आता आशियाई क्रीडा स्पर्धाचे मला वेध लागले आहेत. राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धा या २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धाची रंगीत तालीम आहे असे मी मानतो. ऑलिम्पिकला बराच अवधी असला तरी आतापासूनच मी त्याचे नियोजन करीत आहे.’’

राहुलकडून अपेक्षांची पूर्ती – काका पवार

‘‘राहुल हा खूप मेहनती मल्ल आहे. त्याच्याकडून मला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. खरे तर रिओ ऑलिम्पिकमध्येच तो चमक दाखवू शकला असता. दुर्दैवाने त्याला ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करता आली नव्हती. ही संधी गमावल्यानंतर त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचाच ध्यास घेतला होता. राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धामध्ये त्याने विजेतेपद मिळवले आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्याने अव्वल कामगिरी केली आहे. त्याचाही फायदा त्याला झाला,’’ असे राहुलचे प्रशिक्षक व अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांनी सांगितले.

राहुलकडून कशी मेहनत करून घेतली होती, असे विचारले असता काका म्हणाले, ‘‘यापूर्वीच्या दोन्ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये त्याला दुखापतीमुळे सहभागी होता आले नव्हते. यंदा त्याच्या तंदुरुस्तीबाबत खूप काळजी घेण्यात आली होती. राष्ट्रीय शिबिरात प्रत्येक मल्लाकडून भरपूर मेहनत करून घेतली जाते. तेथे आहार, पूरक व्यायाम व वैद्यकीय मार्गदर्शनही केले जाते. येथे जेव्हा जेव्हा तो येतो, तेव्हा तेव्हा त्याच्या सरावातील नियमितता राखली जाईल याची काळजी आम्ही घेतो. आगामी दोन वर्षे त्याच्यासाठी महत्त्वाची आहेत. त्याच्याकडून आशियाई व ऑलिम्पिकमधील पदकाची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने स्पर्धात्मक अनुभव व सराव याचे योग्य नियोजन केले जाणार आहे.’’

First Published on April 13, 2018 3:16 am

Web Title: rahul aware won gold in commonwealth games 2018