रघुराम राजन यांचे उदाहरण देत प्रशासकीय समितीकडून पाठराखण

नवी दिल्ली/मुंबई : हितसंबंधांच्या आरोपांसदर्भात माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नीती अधिकारी डी. के. जैन यांच्यापुढे साक्ष देत आपली बाजू मांडली. प्रशासकीय समितीने रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे उदाहरण देत द्रविडची पाठराखण केली.

मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविडच्या हितसंबंधांबाबत तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालकपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या द्रविडने ‘आयपीएल’मधील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मालकीच्या इंडिया सिमेंट कंपनीतील पदाचा राजीनामा दिलेला नसून, फक्त बिनपगारी सुट्टी घेतलेली आहे.

या प्रकरणी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी द्रविडची बाजू सावरण्यासाठी नीती अधिकाऱ्यांना एक पत्र दिले आहे. कोणतीही व्यक्ती बिनपगारी सुट्टीवर असल्यामुळे नोकरीबाबत हितसंबंध दर्शवत नसल्याची दोन उदाहरणे राय यांनी या पत्रात मांडली आहेत. ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर राजन हे शिकागो विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी बिनपगारी सुट्टी घेतली होती. याचप्रमाणे अरविंद पानागारिया यांनी ‘निती’ आयोगाचे उपाध्यक्षपद सांभाळण्यासाठी कोलंबिया विद्यापीठातून बिनपगारी सुट्टी घेतली होती, असे राय यांनी नमूद केल्याचे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. ‘‘इंडिया सिमेंट कंपनीमधून कोणतेही मानधन घेत नसल्याचे द्रविडने जाहीर केले आहे. त्यामुळे येथे त्याचे हितसंबंध असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही,’’ असे सूत्रांनी सांगितले.