08 December 2019

News Flash

द्रविडचे हितसंबंध नसल्याचे प्रशासकीय समितीचे स्पष्टीकरण

राहुलप्रकरणी कोणतेही हितसंबंध नाहीत. त्याला हितसंबंधांप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

| August 14, 2019 03:16 am

मुंबई : राहुल द्रविड यांच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदासाठीच्या नियुक्तीमुळे कुठलेही दुहेरी हितसंबंध साधले जात नसल्याचा खुलासा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने केला आहे. आता यासंदर्भात ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी डी. के. जैन निर्णय घेतील, असे प्रशासकीय समितीचे सदस्य रवी थोडगे यांनी सांगितले.

‘‘राहुलप्रकरणी कोणतेही हितसंबंध नाहीत. त्याला हितसंबंधांप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु आम्ही त्याच्या नियुक्तीला हिरवा कंदील दिला आहे. कारण कोणतेही हितसंबंध त्याने जपल्याचे आम्हाला दिसून आलेले नाही. याबाबत आम्ही आमचे मत लवाद अधिकाऱ्यांकडे मांडू,’’ असे प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर थोडगे यांनी सांगितले.

भारतीय क्रिकेटमधील आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या द्रविडला दुहेरी हितसंबंधांप्रकरणी नोटीस प्राप्त झाली होती. द्रविड चेन्नई सुपर किंग्जच्या मालकीच्या इंडिया सिमेंट कंपनीत उपाध्यक्षपदावर कार्यरत असताना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद कसे काय भूषवू शकतात, असा सवाल तक्रारदाराने केला आहे. यासंदर्भात द्रविड यांनी आपले उत्तर लवाद अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी स्वीकार असल्यास इंडिया सिमेंटचा उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल किंवा कार्यकाळ संपेपर्यंत रजा घ्यावी लागेल, असा प्रस्ताव प्रशासकीय समितीने द्रविडपुढे ठेवला होता. द्रविडने राजीनामा देण्याऐवजी पगारविरहित रजेचा मार्ग पत्करला. त्यामुळे मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी द्रविडबाबतची तक्रार कायम ठेवली.

First Published on August 14, 2019 3:16 am

Web Title: rahul dravid has no conflict of interest case bcci committee of administrators zws 70
Just Now!
X