नवी दिल्ली : बेंगळुरु येथे झालेल्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या चारदिवसीय कसोटी सामन्यात १० बळी मिळवून संघाच्या विजयाता मोलाचा वाटा उचलणाऱ्या मोहम्मद सिराजची वाढती प्रगल्भता पाहून फार अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली. गेल्या तीन प्रथम श्रेणी लढतीत तब्बल २५ बळी घेणाऱ्या सिराजचे कौतुक करताना द्रविडने त्याचा १९ वर्षांखालील संघापासून भारताच्या ‘अ’ संघात स्थान मिळवण्यापर्यंतचा प्रवास अद्भुत आहे, असेही म्हटले.

‘‘भारतीय ‘अ’ संघाकडून खेळताना तुमच्या तंत्रावर लक्ष देण्यापेक्षा तुम्ही कारकीर्दीत कोणत्या स्तरावर आहात हे पाहिले जाते. काही खेळाडू राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या जवळ येऊन ठेपलेले असतात, तर काहींची नुकतीच सुरुवात झालेली असते. इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजाने तीन लढतींत २५ बळी मिळवणे म्हणजे एखादा पराक्रम करण्यासारखेच आहे. सिराजकडे प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा दांडगा अनुभव आहे. त्याचाच उपयोग करून आता तो योग्य टप्प्यावर आणि दिशेने गोलंदाजी करू लागला आहे,’’ असे द्रविड म्हणाला.

‘‘गेल्या काही प्रथम श्रेणींच्या हंगामात त्याच्याकडून चांगली कामगिरी होत नसल्यामुळे त्याला संघातून आत-बाहेर केले जात होते. मात्र आता सिराजने त्याच्या गोलंदाजीवर अथक मेहनत घेतली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून सुरेख प्रदर्शन केले. भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी आवश्यक असलेले गुण सिराजकडे आता उपलब्ध असून लवकरच भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात त्याचे स्थान पक्के झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही,’’असे द्रविड म्हणाला.

याव्यतिरिक्त भारतीय ‘अ’ संघाचे तसेच युवा संघाचे अधिकाधिक विदेश दौरे आयोजित करण्यात यावेत अशी इच्छाही द्रविडने व्यक्त केली आहे. तो म्हणाला, ‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पूर्वीपेक्षा आता युवा संघाच्या सामन्यांना ही गांभीर्याने घेत असून त्यांचे तिन्ही प्रकारांतील सामनेही आयोजित करत आहेत. मात्र, भारताबरोबरच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशातही युवा संघाच्या व अ संघातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.’’

‘‘पृथ्वी शॉ, मोहम्मद सिराज, मयांक अगरवाल यांसारखे क्रिकेटपटू विदेशी मैदानांवर खेळून आणखी सुधारतील. त्यांना अधिकाधिक सामने कसे खेळवता येतील याकडेच आमचे लक्ष आहे. कारण त्यांनी १० सामन्यांत जर ४० ते ५० च्या सरासरीने धावा  काढल्या तरी संघातील स्थानासाठी ते प्रबळ दावेदार ठरू शकतात,’’ असे द्रविडने सांगितले.