भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यामध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंकेचा हा दौरा भारतीय संघासाठी खास ठरण्याची चिन्हं दिसत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड या दौऱ्यामध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान जुलै महिन्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ आघाडीच्या खेळाडूंशिवाय जुलैमध्ये श्रीलंकेला जाण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यासारखे मोठे खेळाडू श्रीलंका दौऱ्यामध्ये नसतील. इंग्लंडविरोधात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करण्यासाठी या खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यातून विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय.

विराट कोहली आणि रोहित शर्माबरोबरच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रीसुद्धा या दौऱ्यावर जाणार नाहीयत. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या आपल्या सहकाऱ्यांसोबत राहुल द्रविड या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघासोबत जाण्याची शक्यत आहे. यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र विराट कोहलीचं नेतृत्व करणाऱ्या मुख्य संघातील प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असल्याने श्रीलंका दौऱ्यावर इतर खेळाडूंचा समावेश असणारा संघ पाठवण्यात येईल. भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्याला महत्व देणार आहे.

त्यामुळेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक अरुण यांच्याबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड श्रीलंका दौऱ्यामध्ये भारतीय संघासोबत जाण्याची शक्यता कमीय. त्यामुळेच सपोर्टींग स्टाफ म्हणून राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारत अ संघासोबतचे इतर प्रशिक्षक श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची चिन्हं दिसत आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ युनायटेड किंग्डममध्ये कसोटी टेस्ट चॅम्पियनशीप मालिकेच्या अंतिम सामन्यांपैकी पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरोधात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

राहुल द्रविडने १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाचं प्रशिक्षक पद भूषवलं आहे. त्यामुळे द्रविडसाठी प्रशिक्षक म्हणून संघासोबत जाणं हे फार कठीण ठरणार नाही. ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉसारखे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले खेळाडू द्रविडच्या प्रशिक्षणाखालीच तयार झालेले आङेत. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळलेल्या संघांमधून अनेक नवीन खेळाडू भारताच्या मुख्य संघामध्ये दमदार कामगिरी करताना दिसतायत. शिखर धवन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अङमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव हे खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून भारताच्या मुख्य संघामध्ये स्थान पक्कं करण्याची संधी खेळाडूंकडे आहे.