आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सल्लागार म्हणून राहुल द्रविड याची नियुक्ती करण्यात आली. या दौऱ्यात भारतीय संघ इंग्लडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार असून, यावेळी क्रिकेटविश्वात ‘द वॉल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडचे मार्गदर्शन भारतीय संघाला लाभणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्या विनंतीवरून, इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविड संघाचा सल्लागार बनण्यास तयार झाला. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधून २०१२ साली निवृत्ती पत्कारल्यानंतर राहुल द्रविड पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघासोबत काम करणार आहे. मागील दौऱ्यात भारताला सपाटून मार खावा लागल्याने बीसीसीआयने या दौऱ्यासाठी विशेष काळजी घेतली आहे. भारतीय संघातील युवा क्रिकेटपटूंना द्रविडच्या अनुभवाचा नक्की फायदा होईल, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी म्हटले आहे.