भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत

मुंबई : खेळाच्या ताणासंदर्भातील व्यवस्थापनाचे एकच धोरण सर्वानाच लागू करता येणार नाही. परंतु खेळाडूंना आपल्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे, असे मत माजी कर्णधार आणि भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले.

२३ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलनंतर मे महिन्याच्या अखेरीस विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला  प्रारंभ होत आहे. या पाश्र्वभूमीवर खेळाच्या ताणाचे व्यवस्थापन याविषयीची चर्चा ऐरणीवर आहे. याबाबत द्रविड म्हणाला, ‘‘खेळाच्या ताणासंदर्भात बऱ्याच खेळाडूंना योग्य जाणीव आहे. विश्रांती घेऊन पुनरागन करण्यापेक्षा सातत्याने खेळत राहणे मला अधिक आवडते, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स म्हणतो. प्रत्येक खेळाडू हा स्वतंत्र असतो. त्यामुळेच एकच धोरण सर्वाना लावता येत नाही.’’

विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर क्रिकेट मंडळांनी आयपीएल फ्रेंचायझींना खेळाडूंना विश्रांती देण्यासाठी दडपण आणू नये, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.

..ही तर धोक्याची घंटा!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-३ अशा फरकाने पत्करलेला पराभव ही विश्वचषकाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, असा इशारा द्रविडने दिला आहे.

‘‘इंग्लंडमध्ये आपण आरामात विश्वचषक जिंकू असे म्हटले जाते. असे घडले, तर मला ते अतिशय आवडेल. मात्र नुकत्याच झालेल्या मालिकेतून आपण विश्वचषकासाठीची कामगिरी अधिक उंचावण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.’’