फिक्सिंगचा ‘स्पॉट’ पडलेल्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय क्रिकेटजगतात ‘द वॉल’ म्हणून परिचित असलेल्या राहुल द्रविडने घेतलाय. चॅम्पियन्स लीगनंतर राहुल द्रविड आयपीएललाही रामराम ठोकणार आहे. द्रविडने याआधीच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
वयाच्या ४१व्या वर्षी पुढील मालिकेसाठी १२ महिने थांबणे, हा जरा जास्तच काळ वाटतो. नशिबाने यावेळी आमचा संघ चॅम्पियन्स लीगसाठी निवडला गेलाय. ऑक्टोबरमध्येच ही स्पर्धा होणार आहे. ती स्पर्धा झाल्यानंतर थांबायलाच हवे, असे राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया द्रविडने म्हंटलंय. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. क्वालिफायर फेरीत मुंबई इंडियन्सने शुक्रवारी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक केलीये. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ प्रचंड तणावाखाली होता. या सर्व पार्श्वभूमीवर द्रविडने आयपीएलमधूनही निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.