भारतीय क्रिकेट संघात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण, सेहवाग यासारखे धडाकेबाज खेळाडू होऊन गेले. सचिन आणि सेहवागची नेहमी तुलना केली गेली. तसंच द्रविड आणि लक्ष्मण यांच्यातही तुलना होत होती. पण सचिन आणि द्रविड यांच्या फलंदाजीची तुलना फार कमी वेळा केली गेली. दोघांची खेळाची शैली भिन्न असल्याने तशी तुलना करण्यात आली नाही. पण आता पाकिस्तानचा माजी खेळाडू रमीझ राजा याने सचिन आणि द्रविड यांची तुलना करत महत्वाचे विधान केले आहे.

“सचिनला दैवी देणगी होती. तो उत्कृष्ट फलंदाज होता. त्या तुलनेत द्रविडला ती देणगी म्हणावी तितकी नव्हती. पण तरीही द्रविडने महान फलंदाजांच्या काळात तग धरला आणि दमदार खेळ करून दाखवला. तुम्ही तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करूनही ज्यावेळी तुम्ही संघातील सर्वोत्तम फलंदाज ठरत नाही तेव्हा निराश वाटणं स्वाभाविक आहे. पण द्रविडने निराश न होता खेळ केला आणि अनेकदा तर त्याच्या खेळीने सचिनलाही झाकून टाकलं. फलंदाजीला पोषक नसणाऱ्या खेळापट्ट्यांवर तो अधिक प्रभावी ठरला कारण त्याची बचावात्मक खेळी करण्याची शैली खूपच चांगली होती. त्यामुळेच तिसऱ्या क्रमांकावर तो यशस्वी ठरला”, असे रमीझ राजा म्हणाला.

“द्रविडची महानता ड्रेसिंग रूम मधील त्याच्या वावरातून अनेकदा दिसली. म्हणून द्रविडबद्दल साऱ्यांना आदरच आहे. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी आणि मैदानावरील शांत व संयमी वर्तणुक यामुळे त्याचा कायमच सन्मान केला जाईल.”, असेही त्याने सांगितलं. काही दिवसांपूर्वी विस्डनने घेतलेल्या एका पोलमध्येदेखील चाहत्यांनी द्रविडला पसंती दर्शवली होती.