गेल्या काही वर्षांत देशांतर्गत क्रिकेटमधून असंख्य परिपक्व खेळाडू उदयास आले आहेत. याचे श्रेय राहुल द्रविडला जाते. द्रविडने ऑस्ट्रेलियातील माजी क्रिकेटपटूंशी सातत्याने संवाद साधून येथील पायाभूत सुविधांविषयी जाणून घेतले आणि मग त्याच प्रकारे भारतातही मोहीम राबवली, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केले.

‘‘युवा खेळाडूंचा शोध घेण्याच्या शर्यतीत भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. विशेषत: द्रविडने कुमार आणि ‘अ’ संघातील क्रिकेटपटूंची जबाबदारी घेतल्यामुळे भारतासाठी ते फायदेशीर ठरले,’’ असे ते म्हणाले.

खेळाडूंसाठी अपुरा सरावही फलदायी -श्रीधर

विलगीकरणाच्या कठोर नियमांमुळे भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पुरेसा सराव करण्याची संधी मिळणार नाही. मात्र सध्याचे खेळाडू मानसिकदृष्ट्या कणखर असल्याने या आव्हानावरही ते सहज मात करतील, अशी आश्वासक प्रतिक्रिया भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी व्यक्त केली.