भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा समितने कर्नाटकमधील १४ वर्षाखालील शालेय क्रीडा स्पर्धेत खेळताना धडाकेबाज द्विशतकाची नोंद केली आहे. समिती Mallya Aditi International शाळेचं प्रतिनिधीत्व करतो, BTS Shield स्पर्धेत समितने १४६ चेंडूचा सामना करताना ३३ चौकारांसह द्विशतक झळकावलं. गेल्या काही महिन्यांमधलं समितचं हे दुसरं द्विशतक ठरलं आहे.

समितच्या शाळेने ५० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात ३७७ धावांपर्यंत मजल मारली. Sri Kumaran Children’s Academy विरोधात खेळणाऱ्या समितच्या शाळेने आक्रमक खेळ करत २६७ धावांनी सामना जिंकला. यादरम्यान समितने गोलंदाजीतही आपली चमक दाखवत २ बळी मिळवले.

२०१९ डिसेंबर महिन्यातही समितने असचं द्विशतक झळकावलं होतं. धारवाड संघाविरोधात खेळताना समितने २०१ धावा करत ३ बळी घेतले होते. यानंतर याच सामन्यात दुसऱ्या डावात समितने फटकेबाजी करत नाबाद ९४ धावा केल्या होत्या, मात्र या खेळीनंतरही समितच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.