21 September 2020

News Flash

गुन्हेगारी जगत ते मॅरेथॉनपटू!

कुख्यात टोळीसाठी काम करणाऱ्या राहुल जाधवची संघर्षगाथा

राहुल जाधव

कुख्यात टोळीसाठी काम करणाऱ्या राहुल जाधवची संघर्षगाथा

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : झटपट पैसा कमावण्यासाठी वाईट मार्गाला लागलेल्या आणि त्याद्वारे नैराश्येकडे झुकल्यानंतरही त्यातून मार्ग काढता येऊ शकतो, हे राहुल जाधवने दाखवून दिले आहे. खंडणी, गुन्हेगारी, विकासकांना धमक्या देणे, पैसे दिले नाही तर गोळीबार करणे यांसारखी कामे एका कुख्यात टोळीसाठी काम करताना अनेक वर्षे नैराश्येत आणि पोलीस कोठडीत घालवल्यानंतर त्यातून बाहेर पडण्यासाठी राहुलला मॅरेथॉनचा आधार मिळाला आहे.

उमेदीच्या वयात आलेले अपयश झाकोळण्यासाठी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या राहुलने थेट गुन्हेगारी जगताकडे वळण्याचा मार्ग निवडला. हवाला, खंडणी, धमकावणे, गोळीबार करणे अशी कामे एका कुख्यात टोळीसाठी करताना राहुलवर १३ गंभीर गुन्ह्य़ांची नोंद झाली. पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेला असताना त्यांच्यापासून पळताना राहुलला अनेक व्यसने जडली. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी राहुलला आपल्यापासून दूर केले. अनेक वर्षे पोलिसांना गुंगारा देत असतानाच व्यसनांच्या आहारी गेलेल्या राहुलला अटक झाली. चार वर्षे आर्थर रोड तुरुंगात घालवल्यानंतर राहुलचे मानसिक संतुलन बिघडले. राहुलच्या बाजूने लढा देणाऱ्या वकिलाला संपवल्यानंतर या कुख्यात टोळीनेही राहुलला बाहेर काढण्यापासून हात झटकले. त्यातच वादंगांमुळे त्याची एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात बदली होत होती.

आता आपल्याला कुणाचाही आधार उरला नाही, हे कळल्यानंतर राहुलनेच आपल्या खटल्यांचा अभ्यास करून लढा देण्याचा प्रयत्न केला. अनेक खटल्यांमध्ये जामिनावर बाहेर पडल्यानंतर कुटुंबीयांनी त्याची रवानगी पुण्यातील ‘मुक्तांगण’मध्ये केली. डॉ. अनिल अवचट यांची कन्या मुक्ताताई पुणतांबेकर यांच्याकडून मानसोपचाराचे उपचार घेताना त्याने तिथेच नोकरी पत्करली. ‘मुक्तांगण’मधून मॅरेथॉनमध्ये कोण सहभागी होणार, असे विचारल्यानंतर सर्वप्रथम राहुलने हात वरती केला. गेली अनेक वर्षे मुंबई पोलीस आपल्याला पकडू शकले नाहीत, हे आठवताना राहुलने १० किमीचे अंतर अवघ्या ५४ मिनिटांत पार केले. या शर्यतीत पदक मिळाल्यानंतर राहुलला धावण्याची आवड निर्माण झाली.

मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते दिल्ली हे अंतर पार केल्यानंतर दक्षिण मुंबईत काम करताना मुंब्रा ते डोंबिवली हे ५१ किमीचे अंतर तो दरदिवशी पार करू लागला. अल्ट्रामॅरेथॉन धावपटू म्हणून ओळख मिळाल्यानंतर राहुलला कुटुंबीयांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये आदर मिळू लागला. धावण्यामुळे त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. ‘सकारात्मक विचार आणि नव्याने आयुष्य जगण्याची जिद्द असेल तर काहीही साध्य करता येऊ शकते’ हा संदेश सध्या राहुल इतरांना देत आहे. रविवारी रंगणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किमी.चे अंतर सहजपणे पार करण्यासाठी राहुल सज्ज झाला आहे. ‘मुक्तांगण’मध्ये समुपदेशक म्हणून काम करताना एकेकाळी मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा राहुल सध्या पुणे पोलिसांना व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी धडे देत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 3:38 am

Web Title: rahul jadhav struggle story of criminal world to mumbai marathon zws 70
Next Stories
1 हक्काच्या मॅरेथॉनसाठी मुंबईकर सज्ज!
2 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात तीन सुवर्णपदके
3 ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : प्रज्ञेश मुख्य फेरी गाठण्यात अपयशी
Just Now!
X