भारताची ३६४ धावांपर्यंत दमदार मजल; सामना वाचवण्यासाठी अध्यक्षीय संघाची धडपड

रवींद्र जडेजाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने कॅरेबियन बेटांवर पुन्हा छाप पाडली. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ अध्यक्षीय संघाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी जडेजाने तीन बळी घेत फिरकीची कमाल दाखवली होती. तर दुसऱ्या दिवशी त्याने दिमाखदार अर्धशतक झळकावले आणि भारताला दमदार धावसंख्या उभारून दिली.

जडेजाने ५६ चेंडूंत आठ चौकारांनिशी आपली ५६ धावांची खेळी साकारली. याचप्रमाणे लोकेश राहुल (१२७ चेंडूंत ९ चौकार आणि एक षटकारासह ६४ धावा) आणि कर्णधार विराट कोहली (९४ चेंडूंत ४ चौकारांसह ५१ धावा) यांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने १०५.४ षटकांत पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल मारली.

त्यानंतर, उत्तरार्धातील ८ षटकांत अध्यक्षीय संघाने १ बाद २६ धावा केल्या. ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार लिऑन जॉन्सनला (१७) स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.

अध्यक्षीय संघ अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे दुसऱ्या डावात नऊ फलंदाज बाकी आहेत. उपाहारानंतर राहुल फलंदाजीला आला नाही, तर कोहलीसोबत अजिंक्य रहाणे (७७ चेंडूंत ५ चौकारांसह ३२ धावा) फलंदाजीला उतरला. कोहली अर्धशतकानंतर अधिक काळ तग धरू शकला नाही. रहाणेने स्टुअर्ट बिन्नी (१६)सोबत ४४ धावांची भागीदारी केली. वृद्धिमान साहाने ५ चौकारांसह ३१ धावा केल्या. भारताने दुसऱ्या सत्रात चार फलंदाज गमावले.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ अध्यक्षीय संघ (पहिला डाव) : १८० भारत (पहिला डाव) : १०५.४ षटकांत सर्व बाद ३६४ (लोकेश राहुल ६४, रवींद्र जडेजा ५६, विराट कोहली ५१; राहकीम कॉर्नवॉल ५/११८).वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ अध्यक्षीय संघ (दुसरा डाव) : ८ षटकांत १ बाद २६ (लिऑन जॉन्सन १७; रविचंद्रन अश्विन १/१४).

 

———————————————————————————————————————-

 

मनोज प्रभाकर उत्तर प्रदेशचे रणजी प्रशिक्षक

पीटीआय, कानपूर

भारताचे माजी वेगवान गोलंदाज मनोज प्रभाकर यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या रणजी संघाचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याचप्रमाणे झिम्बाब्वेचे माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांच्याकडे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अकादमीचे सल्लागारपद सोपवण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत प्रभाकर यांनी अफगाणिस्तान संघाचे सल्लागार म्हणून काम पाहिले होते. त्याआधी २०१०-११च्या हंगामात ते दिल्ली रणजी संघाचे प्रशिक्षक होते.

मसुरी येथे झालेल्या उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सचिव राजीव शुक्ला यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.