राजेंद्र देशमुख, पूजा यादव यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार; शहर विभागात मुंबई पोर्ट ट्रस्टची सरशी

मुंबई : प्रभादेवी येथील कामगार कल्याण क्रीडा मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण विभागात रायगडच्या जेएसडब्ल्यू डोलवी आणि महिलांच्या खुल्या गटात देना बँकेने विजेतेपद मिळवले. उभय संघांच्याच अनुक्रमे राजेंद्र देशमुख व पूजा यादव यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले. पुरुष शहर विभागात मुंबई पोर्ट ट्रस्टने जेतेपदाचा किताब मिळवला.

कामगार क्रीडा भवनाच्या क्रीडांगणावर रंगलेल्या या स्पर्धेत ग्रामीण विभागाच्या अंतिम सामन्यात जेएसडब्ल्यूने कोल्हापूरच्या कुंभी कासारी संघावर ३६-२८ अशी मात करून गतवर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. राजेंद्र व राहुल कोळी यांच्या आक्रमक चढाया आणि सूचित पाटीलच्या पकडींनी जेएसडब्ल्यूच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

महिलांच्या खुल्या गटात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या देना बँकेने स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या संघावर ३२-२२ असा सहज विजय मिळवला. पुजा, ऋतुजा बांदवडेकर यांच्या चढाया व पौर्णिमा जेधेच्या पकडींपुढे ठाण्याची डाळ शिजली नाही. पुरुष शहर विभागाच्या अंतिम लढतीत मुंबई पोर्ट ट्रस्टने गतविजेत्या देना बँकेवर रोमहर्षक लढतीत ४२-४१ अशी सरशी साधली.

पुरस्कार विजेत्यांची यादी

पुरुष शहर                                      पुरुष ग्रामीण    महिला खुला गट

सर्वोत्कृष्ट खेळाडू स्मित पाटील      राजेंद्र देशमुख   पूजा यादव

सर्वोत्कृष्ट चढाईपटू                        नितीन देशमुख  राहुल कोळी     सायली नागवेकर

सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक                       अमित जाधव    सतीश पाटील    ज्योती ढफळे