अलिबाग येथील आरसीएफ क्रीडा संकुलमध्ये महा कबड्डी लीग तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी महिलांच्या अ गटात मुंबई डेव्हिल्स संघाने रायगड डायनामोज संघावर ३३-२५ असा विजय मिळवित बाद फेरीत प्रवेशाचा ठाणे टायगर्स पाठोपाठ प्रवळ दावेदार ठरला आहे.
मध्यंतराला मुंबई डेव्हिल्स संघाकडे १६-१३ अशी ३ गुणांची आघाडी होती. सुरवातीला रायगड डायनामोज संघाने आघाडी घेतली होती. मात्र त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही.
मुंबई डेव्हिल्स संघाने १४ व्या मिनिटाला लोण लावत आघाडी घेतली. सायली केरीपाळेने २ पकडींच्या जोरावर ८ गुण मिळवले आणि पौर्णिमा जेधेने मोक्याच्या वेळी केलेल्या ३ पकडींच्या जोरावर आपली पिछाडी कमी करीत
रायगड डायनामोज वर लोण
चढवला.
मध्यंतरानंतर मुंबईच्या सायली केरीपाळेने आपले आक्रमण सुरू ठेवत संपुर्ण सामन्यात १५ गुण मिळवले, तर स्नेहा बिबवेने तीन सुंदर पकडी केल्या.
पौर्णिमा जेधे व राणे यांनी प्रत्येकी ४ गुण मिळवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
रायगड डायनामोजच्या भार्गवी मानेने दमदार पकड करत ५ गुण कमावले, तर कल्याणी व पुनम आवटे यांनी प्रत्येकी ५ पकडी करतआपल्या संघाची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या डावात अभिलाषा म्हात्रेने चांगला खेळ केला मात्रमध्यंतरानंतर तिचा लौकीकाप्रमाणे खेळ झाला नसल्याने प्रेक्षकही नाराज झाले.