धारदार आक्रमणाच्या जोरावर पूर्वार्धात ५-१ अशी आघाडी घेणाऱ्या रेल्वे क्रीडा मंडळाने वरिष्ठ राष्ट्रीय ‘अ’ श्रेणी हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले. अंतिम फेरीत त्यांनी उत्तरप्रदेशचे आव्हान ५-३ असे परतविले. एअर इंडियाने तिसरा क्रमांक मिळविला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत रेल्वे संघाने उपांत्य फेरीत गतविजेत्या एअर इंडियाचा सनसनाटी पराभव केला होता. त्यामुळे अंतिम फेरीत त्यांचे पारडे जड होते. आंतरराष्ट्रीय खेळाडू अमित रोहिदास याने नवव्या, २१ व्या व २९ व्या  मिनिटाला गोल करीत रेल्वेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तलविंदरसिंग (१७ वे मिनिट) व अफान युसुफ (२७ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. उत्तरप्रदेश संघाकडून सुनील यादव याने २५ व्या व ३९ व्या मिनिटाला गोल केला. अमीर खान याने ३८ व्या मिनिटाला उत्तरप्रदेशचा आणखी एक गोल केला.
सामन्याच्या प्रारंभापासूनच रेल्वेच्या खेळाडूंनी धडाकेबाज खेळ केला. नवव्या मिनिटाला त्यांना पेनल्टी स्ट्रोकची संधी लाभली. त्याचा फायदा घेत रोहिदास याने संघाचे खाते उघडले. पाच मिनिटांनी त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी लाभली मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. तथापि आणखी दोन मिनिटांनी त्यांच्या तलविंदरसिंग याने जोरदार चाल करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. या धक्क्य़ातून उत्तरप्रदेश सावरत नाही तोच रोहिदास याने रेल्वेची आघाडी ३-० अशी केली. तथापि उत्तरप्रदेशने कल्पक चाल करीत २५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरची संधी प्राप्त केली. त्याचा फायदा घेत सुनील यादव याने गोल करीत रेल्वेची आघाडी कमी केली.
उत्तरप्रदेशच्या बचावरक्षकांनी केलेल्या चुकांचा फायदा उठवित अफान याने २७ व्या मिनिटाला संघास ४-१ असे अधिक्क्य़ मिळवून दिले. पूर्वार्ध संपण्यापूर्वी रेल्वे संघास पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर रोहिदास याने अचूक गोल केला.
पूर्वार्धातच चार गोलांनी पिछाडीवर असलेल्या उत्तरप्रदेशच्या खेळाडूंनी उत्तरार्धात चांगल्या चाली केल्या. त्यामध्ये त्यांना तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यापैकी दोन कॉर्नरचा लाभ घेत यादव व अमीरखान यांनी प्रत्येकी एक गोल केला. तीन गोल नोंदवूनही उत्तरप्रदेशचे खेळाडू सामन्यात रंगत निर्माण करू शकले नाहीत. कारण तोपर्यंत सामन्यावर रेल्वेची पकड मजबूत झाली होती. रेल्वेने उत्तरार्धात बचावात्मक खेळावरच भर दिला.