हिमाचल प्रदेशला नमवून रेल्वेला महिलांचे विजेतेपद

प्रशांत केणी, लोकसत्ता

जयपूर : हिमाचल प्रदेशला  अखेपर्यंत रोखत ‘सोनाली एक्स्प्रेसने’ सुसाट वेगाने मार्गक्रमण करीत भारतीय रेल्वेला ‘विजयस्थानक’ गाठून दिले. महाराष्ट्राच्या सोनाली शिंगटेमुळे रेल्वेने हिमाचल प्रदेशला ४०-३४ असे नमवून रेल्वेने महिला विभागातील विक्रमी ३३व्या आणि सलग दुसऱ्या राष्ट्रीय कबड्डी विजेतेपदावर मोहोर उमटवली.

दोन वर्षांपूर्वी रेल्वेला पराभवाचा धक्का देण्याची किमया साधणाऱ्या हिमाचलने पूर्णिमा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात प्रारंभीपासूनच रेल्वेला सामन्यावर नियंत्रण मिळवू दिले नाही. मध्यंतराला रेल्वेकडे १६-१५ अशी एका गुणाची आघाडी होती. उत्तरार्धात ही चुरस अधिक वाढली. परंतु सोनालीच्या बोनस कौशल्यापुढे हिमाचलचा संघ निरुत्तर झाला. दोन मिनिटे बाकी असताना हिमाचलवर पडलेला लोण त्यांच्यासाठी महागात पडला. रेल्वेच्या विजयाची शिल्पकार सोनालीने १५ चढायांमध्ये १३ गुण मिळवले. यापैकी आठ बोनस गुणांचा समावेश होता.

‘‘तेजस्विनी बाई आणि ममता पुजारी यांच्या अनुपस्थितीत गेली दोन वर्षे रेल्वेने राष्ट्रीय स्पर्धेवर गाजवलेले वर्चस्व हे मला माझ्या कामगिरीपेक्षाही अधिक मोलाचे वाटते. दडपणाच्या स्थितीतसुद्धा संघाने ईष्रेने खेळून विजेतेपद पटकावले,’’ असे सोनालीने सामन्यानंतर सांगितले.

 

महाराष्ट्रात योग्य निवडप्रक्रियेचा अभाव झ्र्साहा

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात गुणवत्ता आहे. पण योग्य निवड प्रक्रिया राबवली, तर महाराष्ट्राचा संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आपल्या रुबाबाला साजेसा खेळ दाखवू शकतो, असे मत राष्ट्रीय विजेत्या रेल्वेची आणि भारताची प्रशिक्षक बनानी साहा यांनी व्यक्त केले.महाराष्ट्राचा संघ सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत साखळीतच गारद झाला. महाराष्ट्राच्या कामगिरीचे विश्लेषण करताना साहा म्हणाल्या, ‘‘मी जेव्हा रेल्वेकडून खेळायचे. त्यावेळी महाराष्ट्राचाच संघ आमच्याशी अंतिम झुंज द्यायचा. अगदी अखेरच्या चढाईपर्यंत सामने रंगायचे. पण अनेक जिल्ह्यांत बऱ्याच स्पर्धा होतात आणि गुणी खेळाडूंचीही मुळीच वानवा नसल्याचे मला आढळले आहे. मी जशी अखिल भारतीय स्पर्धासाठी महाराष्ट्रात गेले आहे, तसेच महाकबड्डी लीगचे सामनेसुद्धा यू टय़ूबवर पाहिले आहेत. पण योग्य संघबांधणीचा अभाव महाराष्ट्राच्या प्रगतीस हानीकारक ठरतो आहे.’’ यंदाच्या महाराष्ट्राविरुद्ध रेल्वेला एकाच गुणाने विजय मिळवता आला. याविषयी साहा म्हणाल्या, ‘‘बचावपटू अपयशी ठरल्यामुळे आम्हाला अखेपर्यंत विजयासाठी झुंजावे लागले. महाराष्ट्राचा बचाव फारसा प्रभावी नव्हता. त्या तुलनेत आक्रमण उत्तम होते.’’

पुरुषांमध्येही रेल्वेचेच वर्चस्व

अखेरच्या चढाईपर्यंत रंगतदार ठरलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेल्वेने २२वे राष्ट्रीय विजेतेपद प्राप्त करताना बलाढय़ सेनादलाचा २९-२७ असा पाडाव केला. सेनादलाने मध्यंतराला १७-११ अशी आघाडी घेतली होती. परंतु उत्तरार्धात नितीन तोमर आणि रोहित कुमारच्या पकडी झाल्यामुळे सेनादलाची पकड ढिली झाली. नवीन कुमारची अखेरच्या चढाईत झालेली पकड रेल्वेसाठी निर्णायक ठरली. रेल्वेकडून पवन शेरावत (८ गुण) आणि विकास खंडोला (६ गुण) यांनी चढायांमध्ये तर सुनील कुमार आणि रविंदर पहेल यांनी दिमाखदार पकडी केल्या. अंतिम सामना मला सदैव स्मरणात राहील. पूर्वार्धात असलेली सामन्यावरील पकड उत्तरार्धात निसटल्यामुळे जेतेपदाने हुलकावणी दिली, असे सेनादलाचे प्रशिक्षक राम मेहेर सिंग म्हणाले.

सूर्यास्ताआधीच स्पर्धा पूर्ण

सामने चालू असताना व्यासपीठावर उपस्थितांची भाषणे आणि सत्कार यांना राष्ट्रीय स्पर्धेत फाटा देण्यात आला. सामन्यांना आणि खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनामुळे अखेरच्या दिवशी सूर्यास्ताआधीच दोन्ही अंतिम सामने पूर्ण करण्यात राजस्थान कबड्डी संघटनेने यश मिळवले.