इंग्लंड आणि भारत यांच्या महिला टीममध्ये विश्वचषकाचा महामुकाबला इंग्लंडमध्ये रंगला आहे. भारतीय महिला खेळाडूंवर बीसीसीआयनं बक्षीसांची खैरात केली आहे, ज्यानंतर आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही महिला संघाला खास गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघात असलेल्या रेल्वे कर्मचारी महिलांची पदोन्नती करण्याचा म्हणजेच त्यांना प्रमोशन देण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे.

आज होणाऱ्या सामन्यात विश्वचषक भारतानंच जिंकावा अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूही त्याला अपवाद नाहीत. मात्र निकाल काहीही लागला तरीही महिला क्रिकेट टीमवर बक्षीसांचा पाऊस पडणारच हे निश्चित आहे. बीसीसीआयकडून चमकदार कामगिरीबद्दल ५० लाखांचं बक्षीस मिळणारच आहे. तसंच रेल्वेकडून या महिला खेळाडूंचं प्रमोशनही फिक्स झालं आहे.

सध्याच्या घडीला भारतीय महिला क्रिकेट टीममध्ये १० खेळाडू अशा आहेत ज्या रेल्वेत नोकरी करत आहेत. या सगळ्यांपैकी मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या दोघींचा खेळ आणि कामगिरी दमदार झाली आहे. सेमीफायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं केलेली नाबाद १७१ धावांची खेळी ही तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोरली गेली आहे. त्याचमुळे या दोघींसह अन्य खेळाडूंची पदोन्नती करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला आहे. एवढंच नाही तर चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंना भारतीय रेल्वे तर्फे रोख स्वरूपातही बक्षीस दिलं जाणार आहे.

मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्याशिवाय एकता बिश्त, पुनम राऊत, वेदा कृष्णमूर्ती, पुनम यादव, सुषमा वर्मा, मोना मेश्राम, राजेश्वरी गायकवाड आणि नुझहत परवीन या खेळाडूही रेल्वेतच नोकरी करतात. बीसीसीआयनं या टीमला ५० लाख रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. जर आज महिलांच्या टीमनं विश्वचषक जिंकून आणला तर बक्षीसांचा हा पाऊस आणखी वाढेल यात शंकाच नाही. महिलांच्या संघानं विश्वचषकाच्या महामुकाबल्यात २००५ नंतर आत्ताच अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे त्याचमुळे बीसीसीआय आणि रेल्वे खातं यांच्याकडून या खेळाडूंचं कौतुक होतं आहे आणि बक्षीसंही दिली जात आहेत.

महिला क्रिकेट संघाच्या सगळ्याच खेळाडूंनी फायनलपर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. या सगळ्याच मुली इंग्लंडविरोधात चांगला खेळ करून विश्वचषक जिंकतील अशी मला खात्री आहे असा विश्वास कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्सचे अध्यक्ष विनोद राय यांनी व्यक्त केला आहे. आजच्या घडीला या मुलींचा खेळ पाहून आणखी चांगल्या महिला खेळाडू तयार होतील असा विश्वासही राय यांनी व्यक्त केला आहे.