साखळीतील अधिक विजयांच्या नियमामुळे छत्तीसगड उपांत्य फेरीत

बेंगळूरु : पावसाच्या खेळखंडोब्यामुळे गतविजेत्या मुंबईला मंगळवारी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. यशस्वी जैस्वाल (नाबाद ६०) आणि आदित्य तरे (नाबाद ३१) या सलामी जोडीच्या भागीदारीमुळे मुंबई विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतानाच पावसामुळे सामना अर्धवटच रद्द करण्यात आला. परंतु साखळीत मुंबईपेक्षा एक जास्त विजय मिळवल्याने छत्तीसगडने उपांत्य फेरी गाठली.

आलूर येथील केएससीए स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना धवल कुलकर्णीने (आठ षटकांत, नऊ धावा आणि दोन बळी) केलेल्या टिचून गोलंदाजीमुळे मुंबईने छत्तीसगडला ४५.४ षटकांत ६ बाद १९० धावांवर रोखले. कर्णधार हरप्रीत सिंग (८३) आणि अमनदीप खरे (नाबाद ५९) यांनी चौथ्या गडय़ासाठी १३५ धावांची भागीदारी रचल्यामुळे छत्तीसगडला किमान पावणेदोनशे धावांपर्यंत मजल मारता आली. शिवम दुबे, शार्दूल ठाकूर, ध्रुमिल मतकर यांनीही मुंबईसाठी प्रत्येकी एक बळी मिळवला. पावसामुळे मुंबईपुढे ४० षटकांत १९२ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.

प्रत्युत्तरात गेल्या लढतीतील द्विशतकवीर यशस्वी आणि अनुभवी तरे यांनी पुन्हा एकदा दमदार सलामी नोंदवताना अवघ्या ११.३ षटकांत ९५ धावा फटकावल्या. विशेषत: १७ वर्षीय यशस्वीने प्रत्येकी पाच चौकार आणि षटकारांसह ३८ चेंडूंतच ६० धावा केल्या. ही जोडी मुंबईला सहज विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच पावसाचे पुन्हा आगमन झाले. त्यानंतर किमान एक तास वाट पाहूनही खेळ सुरू करणे शक्य नसल्यामुळे अखेरीस पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठण्याचे मुंबईचे स्वप्न भंगले. आता तमिळनाडू विरुद्ध गुजरात आणि कर्नाटक विरुद्ध छत्तीसगड या उपांत्य लढती रंगतील.

पराभवाची कारणमीमांसा

* ‘व्हीजेडी’ नियमानुसार निकाल लावण्यासाठी मुंबईच्या डावाची किमान २० षटके पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु फक्त ११.३ षटकांचा खेळ झाला.

* साखळी फेरीत छत्तीसगडने पाच, तर मुंबईने चार विजय मिळवले होते. त्यामुळे छत्तीसगडला पुढे चाल देण्यात आली.

* जर दोन्ही संघांची साखळीतील विजयांची संख्या समसमान असती, तर ज्या संघाचे सर्वाधिक गुण तो पुढील फेरीस पात्र ठरला असता.

* गुणही समान असल्यास साखळीत झालेल्या लढतीत ज्या संघाने विजय मिळवला, त्या संघाला पुढे चाल. छत्तीसगडने मुंबईला साखळीतही पराभूत केले होते. त्यामुळे येथेही मुंबईच्या पदरी निराशाच पडली असती.

संक्षिप्त धावफलक

छत्तीसगड : ४५.४ षटकांत ६ बाद १९० (हरप्रीत सिंग ८३, अमनदीप खरे ५९*; धवल कुलकर्णी २/९) विजयी वि. मुंबई : ११.३ षटकांत बिनबाद ९५ (यशस्वी जैस्वाल ६०*, आदित्य तरे ३१*).