|| ऋषिकेश बामणे

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामन्यांत प्रेक्षकांना फक्त पावसाचाच खेळ पाहावा लागला. मात्र पावसामुळे सामना रद्द होण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीच्या विश्वचषकांमध्येही विविध कारणांनी एकही चेंडू न टाकता सामने रद्द झाले आहेत. विश्वचषकातील अशाच काही अस्मानी-सुलतानी कारणांचा या लढतींना फटका बसला आहे.

विश्वचषकाच्या इतिहासातील जुनी पाने उलटून पाहिल्यास रद्द झालेल्या सामन्यांच्या यादीतील पहिली लढत म्हणून श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याची नोंद होते. १९७९च्या विश्वचषकातील ‘ब’ गटाच्या साखळी सामन्यात उभय संघ आमनेसामने आले होते, मात्र जोरदार पावसामुळे सामना नाणेफेकीपूर्वीच रद्द करण्यात आला. या सामन्यासाठी तब्बल दोन दिवस राखीवसुद्धा ठेवण्यात आले होते, मात्र तरीही खेळ होऊ शकला नाही. त्यानंतर विंडीजने गटसाखळीत अग्रस्थान मिळवले आणि पुढे जाऊन दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.

१९९६ मध्ये विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने सुरक्षिततेच्या कारणास्तव सामन्यातून माघार घेण्याची वेळ ओढवली. भारत, श्रीलंका व पाकिस्तान संयुक्तपणे या विश्वचषकाचे आयोजन करत होते. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साखळी सामन्याच्या तीन आठवडय़ांपूर्वीच यजमान श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल एक हजार जणांचा बळी गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुरक्षेचे कारण पुढे करत कोलंबोत जाण्यास नकार देत मुंबईतच राहणे पसंत केले. कांगारूंनी माघार घेतल्यामुळे श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. पुढे अंतिम फेरीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियालाच नमवून जगज्जेतेपदावर कब्जा केला. याच विश्वचषकातील श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कोलंबो येथेच होणाऱ्या लढतीतून विंडीजने माघार घेतल्यामुळे पुन्हा एकदा श्रीलंकेला विजय बहाल करण्यात आला. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजला ‘आयसीसी’चा भरुदडही भरावा लागला.

धक्कादायक विश्वचषक म्हणून २००३च्या विश्वचषकाची गणना केली जाते. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि इंग्लंड या संघांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्याशिवाय या विश्वचषकातसुद्धा दोन सामने एकही चेंडू न फेकता रद्द करण्यात आले. १५ फेब्रुवारी रोजी होणारा झिम्बाब्वे विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना राजकीय अस्थिरतेमुळे रद्द करण्यात आला. त्या वेळी झिम्बाब्वेमध्ये रॉबर्ट मुगाबे यांचे राज्य होते. मुगाबे यांच्याविरोधात मोर्चे, जाळपोळ असे बंडाचे वातावरण सुरू होते. त्यामुळे इंग्लंडचे त्या वेळचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी आपल्या खेळाडूंना झिम्बाब्वेमध्ये जाण्यास नकार दिल्याने सामना रद्द होऊन नियमाप्रमाणे झिम्बाब्वेला विजयी घोषित करण्यात आले. पुढच्याच आठवडय़ात (२१ फेब्रुवारी) केनियाविरुद्ध सुरक्षेचे कारण पुढे करत न्यूझीलंडने माघार घेतली. याचा केनियाला लाभ झाला व विश्वचषकाच्या इतिहासात त्यांनी पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारली.

२००७ व २०११च्या विश्वचषकात एकही सामना नाणेफेकीशिवाय रद्द करण्यात आला नाही. मात्र २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पूर्ण सामन्यावर पावसाने पाणी फेरल्यामुळे आणखी एका रद्द सामन्याची नोंद झाली.

चालू विश्वचषकात श्रीलंका-पाकिस्तान, श्रीलंका-बांगलादेश आणि भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामने मुसळधार पावसामुळे रद्द झाले आहेत. एकाच विश्वचषकात पावसामुळे तीन संपूर्ण सामने रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तर दक्षिण आफ्रिका व विंडीज यांच्यातील लढत सुरुवातीच्या सात षटकांनंतर आलेल्या जोरदार पावसामुळे अर्धवट रद्द करण्यात आली.

अर्धवट सामन्यांची संख्या अधिक

पावसामुळे अर्धवट रद्द झालेल्या सामन्यांची यादीही मोठी असून १९७५ ते २०१९च्या विश्वचषकापर्यंत आठ सामने अर्धवट रद्द झाले आहेत. मात्र १९९६च्या विश्वचषकातील भारत-श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये जाळपोळ केल्यामुळे रद्द करण्यात आला व श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले.

अर्धवट राहिल्यामुळे रद्द झालेले सामने

  • भारत वि. ऑस्ट्रेलिया (१९९२)
  • भारत वि. श्रीलंका (१९९२)
  • पाकिस्तान वि. इंग्लंड (१९९२)
  • झिम्बाब्वे वि. न्यूझीलंड (१९९९)
  • पाकिस्तान वि. झिम्बाब्वे (२००३)
  • वेस्ट इंडिज वि. बांगलादेश (२००३)
  • श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया (२०११)
  • दक्षिण आफ्रिका वि. वेस्ट इंडिज (२०१९)