भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना पाऊस आणि त्यानंतर खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिला चेंडू टाकण्याआधीच, गुवाहटीत पावसाला सुरुवात झाली. साहजिकच यामुळे सामना सुरु होण्यास विलंब झाला, काही क्षणांनंतर पाऊस थांबला देखील…मात्र खेळपट्टीवरील काही भाग ओलसर राहिला होता. ज्यामुळे सामना रद्द करण्यात आला. मात्र हा सामना रद्द होण्यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

खेळपट्टीचा ओला भाग सुकवण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. इस्त्री, हेअर ड्रायर यासारख्या अनेक गोष्टींचा वापर करुन हा भाग सुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. Star Sports वाहिनीवर बोलत असताना, समालोचक आकाश चोप्रा याने यामागचं खरं कारण सांगितलं. “ही क्षुल्लक चूक आहे. खेळपट्टी झाकण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांनी जी कव्हर घातली होती, त्यात काही ठिकाणी भोकं पडली होती…ज्यामधून काही प्रमाणात पाणी खेळपट्टीवर गेलं. हा निष्काळजीपणा आहे, आंतरराष्ट्रीय सामन्यात तुम्ही अशा चुका करुच शकत नाही.”

पंचांनी खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी अनेक निरीक्षणं केली…सामना सुरु होईल अशी कोणतीही चिन्हं दिसत नसल्यामुळे अखेरीस सामना रद्द करण्यात आला. किमान ५ षटकांचा सामना खेळवण्यासाठी निर्धारित करण्यात आलेली ९ वाजून ४६ मिनीटांची वेळ निघून गेल्यानंतर सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी इंदूरच्या मैदानावर होणार आहे.