भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभवानंतर दमदार पुनरागमनासाठी भारतीय संघ सज्ज झाला होता. मात्र पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला.
रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी सकाळपर्यंत पावसाने उसंत घेतली नव्हती. फक्त २०-३० मिनिटे विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. खेळपट्टी ओली झाली असल्याने पंचांनी अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दुसरा एकदिवसीय सामना २७ ऑगस्टला कार्डिफ येथे होणार आहे.  हा सामना होऊ न शकल्याने पाच सामन्यांची ही मालिका ०-० बरोबरीत आहे. कसोटी मालिकेतील दारुण पराभवानंतर भारतीय संघाच्या संचालकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या जोडीने संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नव्या चमूसाठी ही लढत पहिले आव्हान होते. मात्र पावसाने खो घातल्यामुळे भारतीय खेळाडूंच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. विजयी परंपरा कायम राखण्यासााठी उत्सुक इंग्लंड संघाचीही निराशा झाली.