संततधार पावसामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीही खेळ होऊ शकला नाही.
दुसऱ्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आल्याने सोमवारी खेळ अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार होता. मात्र रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी पावसाचा जोर कायम राहिला. पावसाची तीव्रता कायम राहिल्याने खेळपट्टी आणि मैदान निसरडे झाले होते. खेळण्यायोग्य परिस्थिती नसल्याने दुपारीच पंच रिचर्ड केटेलबोरो आणि इयान गोल्ड यांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
सलामीच्या दिवशी भारतीय फिरकीपटूंच्या भेदक माऱ्यासमोर खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडाली आणि त्यांचा डाव २१४ धावांतच संपुष्टात आला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिखर धवन आणि मुरली विजय या सलामीवीरांनी बिनबाद ८० अशी दमदार सलामी दिली.