भारताचा हॉकीपटू युवराज वाल्मिकीच्या घरात गुडघाभर पावसाचे पाणी साचले असून ते बाहेर काढताना त्याची तारांबळ उडाली आहे.

युवराजने ‘ट्विटर’वर एक व्हिडियो टाकून मुंबई महानगरपालिका आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून मदतीची याचना केली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून युवराजच्या मरिन लाइन्स येथील घरात गुडघाभर पाणी साचले आहे. त्याने मिळवलेली चषके  आणि पदके  पाण्यामुळे भिजली असून ती दुसऱ्यांच्या घरात ठेवावी लागली आहेत. नऊ वर्षांपूर्वी राज्य सरकारने घराचे आश्वासन देऊनही युवराजची घराची प्रतीक्षा संपलेली नाही.

युवराजने नेदरलँड्सला झालेल्या २०१४च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. लहान भाऊ देविंदर हासुद्धा बचावपटू म्हणून भारतीय संघाकडून खेळला आहे.