दिल्ली पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी बोलावल्यानंतर गुरुवारी सकाळी राज कुंद्रा प्रसारमाध्यमांवर चांगलाच भडकला होता. ‘ट्विटर’च्या माध्यमातून त्याने प्रसारमाध्यमांवर आगपाखड करीत गवगवा केला. परंतु कुंद्राच्या या ‘ट्विटर’बाजीचा फुगा दुपारी दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या पत्रकार परिषदेनंतर फुटला.
राज कुंद्राला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागणार आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले. त्यावर कुंद्राने ‘ट्विटर’वर म्हटले होते की, ‘‘हो, मुंबईमधील वातावरण फारच गरम आहे. अविश्वसनीय सूत्रांकडून माहिती घेऊन प्रसारमाध्यमे गोष्टींचा विपर्यास करत आहेत. बातम्या विकण्यासाठी प्रसारमाध्यमे मूर्खपणा का करत आहेत. आतापर्यंत अटक वॉरंट आले आहे का? मी मुंबईत पुन्हा परततोय. दिल्ली पोलिसांना जे काम करायचे ते त्यांनी करावे आणि प्रसारमाध्यमांनी अपमान करणारी विधाने वापरू नयेत.’’
कुंद्राची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही प्रसारमाध्यमांवर ‘ट्विटरवरून टीका केली आहे. ‘‘विकत घेतलेल्या लोकांकडून बातमी करण्यापेक्षा खरी बातमी मिळवा. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत करायला तयार आहोत.’’