‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ आणि सट्टेबाजीचा कबुलीजबाब देणारा सहमालक राज कुंद्रा यांचे भवितव्य अधांतरी आहे. स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे हादरलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सोमवारी कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आवश्यकता भासल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून देण्यात आले आहेत.
राजस्थान रॉयल्सचा हिस्सेदार कुंद्राने सट्टेबाजी केल्याची कबुली दिल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली आहे. वादविवादाच्या पाश्र्वभूमीवर आयपीएलची प्रतिष्ठा जपण्यासाठी बीसीसीआयला कडक पावले उचलण्याचे मोठे दडपण आहे.
‘‘राज कुंद्रा प्रकरणावर या बैठकीत सखोल चर्चा होणार आहे. चौकशी चालू असेपर्यंत कुंद्रावर निलंबनाची कारवाई करण्यासंदर्भात व्यवस्थापन समितीचे सदस्य शिफारस करू शकतील. जर तो दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याचप्रमाणे तो निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला पुन्हा आपली पत मिळवता येईल,’’ असे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले.
‘‘राज कुंद्राचे राजस्थान रॉयल्समध्ये ११.७ टक्के समभाग आहेत. कुंद्रा कायद्याचा आदर करणारा व्यक्ती आहे, त्यामुळे तो कायद्याचा भंग करणार नाही,’’ असे राजस्थान रॉयल्सचे अध्यक्ष रणजित बर्थकुर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघू अय्यर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

..तर राजस्थान रॉयल्सची हकालपट्टी
कुंद्रावरील आरोप सिद्ध झाल्यास राजस्थान रॉयल्सची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात येईल. हे संकट टाळण्यासाठी संघ व्यवस्थापनाने आधीच कुंद्रापासून अंतर ठेवण्यास प्रारंभ केला आहे. कुंद्राचा फ्रेंचायझी चालवण्यामध्ये सहभाग नाही. याचप्रमाणे दोषी आढळल्यास त्याला निलंबित करण्यात येईल. तसेच नियमांचा भंग केल्यास कुंद्राला आपली हिस्सेदारी गमवावी लागेल, असे राजस्थान रॉयल्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
फ्रेंचायझी करारातील कलम ११.३ (क) अनुसार, खेळाच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवणारे कृत्य कोणत्याही मालकाने केल्यास त्या संघाला आयपीएलमधून निलंबित करण्यात येईल.

राजस्थान रॉयल्समधील हिस्सेदारी
सुरेश चेल्लाराम आणि परिवार (ट्रेस्को आंतरराष्ट्रीय लि.) : ४४.२%
मनोज बदाले (इमर्जिग मीडिया) : ३२.४%
राज कुंद्रा व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची (कुकी गुंतवणूक) : ११.७%
लालचन मरडॉक (ब्ल्यू वॉटर इस्टेट लि.) : ११.७%

कोषाध्यक्ष पदावर टी. वेंकटेश यांची वर्णी लागणार?
बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये संजय पटेल यांच्या सचिव पदाच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात येईल. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे संजय जगदाळे यांनी सचिव पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागी पटेल जबाबदारी स्वीकारतील.
बीसीसीआय अजय शिर्के यांचे रिक्त झालेले कोषाध्यक्ष पद भरण्यासाठी उत्सुक आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष टी. वेंकटेश यांचे नाव संभाव्य व्यक्तींमध्ये अग्रणी आहे.

सवानी यांच्या अहवालावर चर्चा होणार
एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख रवी सवानी यांनी तयार केलेल्या चौकशी अहवालावर सोमवारी कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सामान्यत: बीसीसीआयची शिस्तपालन समिती या तिघांसमोर सुनावणी करेल. परंतु सध्या हे तिघे जण न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे या सुनावणीस उशीर होऊ शकेल.