राजस्थान क्रिकेट असोसिएशनने शुक्रवारी खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा केला. येत्या हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) समन्वयक नेमून राजस्थान क्रिकेटचा कारभार चालवेल आणि निवड समिती निश्चित करणार आहे.
राजेश बिश्नोई आणि आणखी काही जणांनी केलेल्या याचिकेबाबत सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. एन. भंडारी यांनी बीसीसीआयमार्फत होणाऱ्या स्थानिक स्पध्रेत राजस्थानचा संघ भाग घेऊ शकतो, असे निर्देश दिले.
राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांच्यात वादावर तोडगा निघत नाही, तोवर ही प्रक्रिया चालू राहील, असे भंडारी यांनी सांगितले. राजस्थानच्या क्रिकेटपटूंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून खेळाडूंवरील अन्याय दूर करावा, अशी विनंती केली होती.
नामांकित क्रीडा प्रशासक अमृत माथूर यांची समन्वय म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. खेळपट्टीतज्ज्ञ तपोश चटर्जी यांची साहाय्यक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचप्रमाणे राजिंदर सिंग हंस आणि प्रीतम गंधे यांची अनुक्रमे वरिष्ठ आणि कनिष्ठ
गटासाठीच्या निवड समितीचे प्रमुखपद सोपवण्यात आले आहे.