मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएल २०२१च्या हंगामात खेळू शकणार नाही. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) शुक्रवारी याची माहिती दिली.

२६ वर्षीय आर्चरला कोपर दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर बसावे लागले होते. मात्र, आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तो भारतात येणार नसल्याचे सांगितले आहे. आर्चरचा काउंटी क्लब ससेक्स त्यांच्या वैद्यकीय प्रगतीचा आढावा घेईल.

 

ईसीबीने सांगितले, की आर्चर आता पुढच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या प्रशिक्षण सत्राचा पाठपुरावा करेल आणि ससेक्स संघासोबत पूर्ण प्रशिक्षण घेईल. जर तो गोलंदाजी करू शकत असेल तर पुढील पंधरवड्यात त्याच्याकडून क्रिकेटमध्ये पुनरागमन होणे अपेक्षित आहे. तो खेळू लागल्यावर ईसीबी पुष्टी करेल.

आयपीएल २०२१मधून बाहेर पडणारा आर्चर हा राजस्थानचा दुसरा खेळाडू आहे. याआधी बेन स्टोक्सलाही दुखापतीमुळे आयपीएलचा नवा हंगाम सोडावा लागला. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यात राजस्थानला फक्त दिल्लीविरुद्ध विजय साकारता आला आहे.

संभाव्य प्लेईंग XI

राजस्थान संघ

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, मनन वोहरा, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया.

कोलकाता संघ

नितीश राणा, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, ईऑन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नरिन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती, प्रसिध कृष्णा.