राजस्थान क्रिकेट संघटनेच्या वादामुळे स्टेडिमयला कुलूप

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर शनिवारी सवाई मानसिंग स्टेडियमच्या बाहेर जवळपास अर्धा तास ताटकळत बसण्याची वेळ ओढवली. राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) आणि राजस्थान राज्य क्रीडा परिषद (आरएसएससी) यांच्यातील वादामुळे स्टेडियमला कुलूप असल्यामुळे हा प्रकार घडला.

रहाणेसह राजस्थान रॉयल्सचे काही खेळाडू सरावासाठी सवाई मानसिंग स्टेडियमबाहेर आले असता, स्टेडियमला कुलूप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर फ्रेंचायझींच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळाली. हे स्टेडियम आरएसएससीच्या अंतर्गत येते. हे स्टेडियम क्रिकेट सामन्यांकरिता वापरण्यासाठी आरसीएला पैसे भरावे लागतात.

‘‘आरसीए आणि आरएसएससी यांच्यात पैशांच्या मुद्दय़ावरून नेहमीच वाद होत असतात. ललित मोदी राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असल्यापासून हे वाद सुरू होते. आयपीएलच्या वेळेला फ्रेंचायझींकडून सर्व देणी चुकती करण्यात येतात. त्याचबरोबर मोफत पासेससाठी आरएसएससी यांच्याकडून नेहमीच आमच्यावर दबाव आणण्यात येतो. अलीकडेच सर्व पैसे भरल्यानंतरही हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे,’’ असे राजस्थान रॉयल्सच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

सुरक्षाव्यवस्थेचा भाग म्हणून हा प्रकार घडल्याचे आरसीएचे सहसचिव महेंद्र नाहर यांनी सांगितले. ‘‘शुक्रवारी काही अनोळखी व्यक्ती राजस्थान संघाचे सराव शिबीर सुरू असताना स्टेडियमच्या आत घुसल्या होत्या. त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. स्टेडियमचे दरवाजे उघडण्यापूर्वी अशा घटना घडू नयेत, याची काळजी घेतली जात आहे,’’ असेही नाहर म्हणाले.