आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची विजयी घोडदौड सुरूच आहे. बंगळुरुने राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत विजयी चौकार मारला आहे. या सामन्यात विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. राजस्थानने विजयासाठी दिलेले १७८ धावांचे लक्ष्य त्यांनी सहज गाठले. बंगळुरूने १७व्या षटकातच हे आव्हान पूर्ण केले. १० गडी राखून आणि २१ चेंडू शिल्लक ठेवून बंगळुरूने हा विजय मिळवला. देवदत्तने ५२ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या. तर विराटने ४७ चेंडूत नाबाद ७२ धावा केल्या.

मागील वर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या देवदत्तने या सामन्यात राजस्थानची धुलाई केली. त्याची फटकेबाजी पाहून राजस्थानने एक गमतीशीर ट्विट केले आहे. पडिक्कल प्लीझ थांब, असे ट्विट राजस्थानने केले आहे.

 

राजस्थानच्या गोलंदाजांना विराट आणि देवदत्तची जोडी फोडण्यात सपशेल अपयश आले. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरूचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. बंगळुरूने यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबईला, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केले आहे. या विजयासह बंगळुरुचे गुणतालिकेत ८ गुण झाले आहेत.

विराटच्या ६००० धावा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात ६००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. राजस्थानविरुद्धचा सामना हा आयपीएलमधील कोहलीचा  १९६वा सामना होता. आयपीएल कारकिर्दीत त्याने ५००हून अधिक चौकार आणि २००पेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.