बाद फेरीसाठी अखेरचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी गरजेचे

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आता अखेरच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. मात्र अजूनही हैदराबाद व चेन्नई वगळता कोणते दोन संघ बाद फेरी गाठणार हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळेच १३ सामन्यांतून प्रत्येकी सहा विजयांसह गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये शनिवारी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित करेल, तर पराभूत संघ थेट स्पर्धेबाहेर फेकला जाईल.

सलामीवीर जोस बटलर आणि अष्टपैलू बेन स्टोक्स मायदेशी परतल्याने राजस्थानची फलंदाजी नक्कीच कमकुवत झाली आहे. संजू सॅमसनही मागील काही लढतींपासून सुमार कामगिरी करत आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने यंदाच्या सत्रात एकदाही संघाला विजय मिळवून दिलेला नाही. गोलंदाजांच्या बळावर राजस्थानने स्पर्धेच्या उत्तरार्धात पुनरागमन केले. जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट आणि कृष्णप्पा गौतम यांच्यावरच राजस्थानच्या विजयाची जबाबदारी आहे.

दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बेंगळूरुने सलग तीन विजयांची नोंद करत स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवले आहे. कोहलीशिवाय एबी डी’व्हिलियर्सवर बेंगळूरु अवलंबून आहे. मोईन अलीने अष्टपैलू खेळ केल्यामुळे बेंगळूरुचा संघ समतोल वाटत आहे. गोलंदाजीत त्यांचे उमेश यादव व युजवेंद्र चहल सुरेख कामगिरी करत आहेत.

  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स