राजस्थानचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय
* संजू सॅमसनचे वेगवान अर्धशतक  * शेन वॉटसनचा अष्टपैलू खेळ
केरळचा उदयोन्मुख फलंदाज संजू सॅमसनने केलेल्या तडाखेबाज अर्धशतकामुळेच राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चार विकेट्स आणि एक चेंडू राखून रोमहर्षक विजय मिळविला.
उत्कंठापूर्ण झालेल्या या लढतीत विजयासाठी राजस्थानपुढे १७२ धावांचे आव्हान होते. सॅमसन व शेन वॉटसन यांची ६८ धावांची भागीदारी तसेच वॉटसन व ब्रॅड हॉज यांची ४६ धावांची भागीदारी होऊनही शेवटच्या षटकांत राजस्थानने हॉज व ओवेस शाह यांच्या विकेट्स गमावल्या. त्यामुळे हातातोंडाशी आलेला विजय राजस्थान गमावणार की काय, अशी चिंता निर्माण झाली. तथापि विनयकुमारच्या या षटकातील पाचव्या चेंडूवर स्टुअर्ट बिन्नी याने चौकार मारून संघास विजयश्री मिळवून दिली. राजस्थानचा नऊ सामन्यांमध्ये सहावा विजय आहे. त्यांचे आता बारा गुण झाले आहेत.
राजस्थानने अजिंक्य रहाणे (२) याची विकेट गमावली. कर्णधार राहुल द्रविड याने १७ चेंडूंत चार चौकारांसह २२ धावा केल्या. हे दोघे बाद झाले, त्या वेळी त्यांच्या २ बाद ४८ धावा झाल्या होत्या. सॅमसन याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत चौफेर टोलेबाजी केली. त्याने ४१ चेंडूंमध्ये ६३ धावा टोलविताना सात चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली. दुसऱ्या बाजूने वॉटसन यानेही आत्मविश्वासाने खेळ केला. थॉमसन बाद झाल्यानंतर त्याच्या जागी आलेल्या हॉजने वॉटसनला चांगली साथ दिली. या जोडीने ४६ धावांची भर घातली आणि संघाचा विजय दृष्टिपथात आणला. सॅमसन याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
तत्पूर्वी, रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या सर्वच फलंदाजांच्या एकत्रित कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सनी १७१ धावांची मजल मारली. धडाकेबाज ख्रिस गेलने अभिनव मुकुंदच्या साथीने डावाची सुरुवात केली. ६ चौकार आणि एका षटकारासह १६ चेंडूत ३४ धावा करुन गेल बाद झाला. शेन वॉटसनने राजस्थानला ही महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. सिद्धार्थ त्रिवेदीने मुकुंदला त्रिफळाचीत केले. त्याने १९ धावा केल्या. मोठा फटका मारण्याच्या नादात ए बी डीव्हिलियर्स २१ धावा करुन श्रीसंतच्या गोलंदाजीवर बाद झाला. आतापर्यंत दुसऱ्या बाजूने संयमी खेळ करणाऱ्या कर्णधार कोहलीचा संयम वॉटसनने भेदला. त्याने ३२ धावा केल्या. मॉइझेस हेन्रिक्सने २ चौकार आणि एका षटकारासह १९ चेंडूत २२ धावा फटकावल्या. आर. विनय कुमारने ३ उत्तुंग षटकारांसह ६ चेंडूत २२ धावा केल्या, विनयच्या या फटकेबाजीमुळे बंगळुरूला दीडेशचा टप्पा ओलांडता आला. शेन वॉटसनने २२ धावांत ३ बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ६ बाद १७१ (ख्रिस गेल ३४, विराट कोहली ३२; शेन वॉटसन ३/२२) पराभूत विरुद्ध राजस्थान रॉयल्स : १९.५ षटकांत ६ बाद १७३ (संजू सॅमसन ६३, शेन वॉटसन ४१, ब्रॅड हॉज ३२; रवी रामपाल २/२८)
सामनावीर : संजू सॅमसन.