कोपनहेगन, डेन्मार्क येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मंगल सिंग चाम्पियाने पुरुषांच्या रिकव्र्ह प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशासह रिओ ऑलिम्पिकवारी पक्की केली. रजत चौहानने कंपाऊंड प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत प्रवेशासह रजत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आहे. दरम्यान, महिलांमध्ये लक्ष्मीराणी माझी रिकव्र्ह प्रकारात कांस्यपदकासाठीची लढत खेळणार आहे.
३१ वर्षीय मंगल सिंगने सहाव्या मानांकित स्पेनच्या अँटोनिओ फर्नाडिझवर ६-२ अशी मात केली. दीपिका कुमारी, लक्ष्मीराणी माझी आणि रिमी ब्युरील या त्रिकुटाने रिकव्र्ह प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला होता.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक पटकावण्याची मंगल सिंगची संधी हुकली. व्हेनेझुएलाच्या एलियास मालवेने मंगल सिंगला ६-४ असे नमवले. मंगल सिंगकडे ४-२ अशी आघाडी होती. मात्र या आघाडीचा त्याला फायदा उठवता आला नाही. झारखंडच्या मंगल सिंगने गुरुवारी झालेल्या पहिल्या लढतीत स्पेनच्या मिग्युएल अल्वारिनो गार्सिआवर विजय मिळवला होता.
गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या रजतने एकतर्फी लढतीत कोलंबियाच्या कॅमिलो काडरेनावर १४३- १३८ असा विजय मिळवला. शनिवारी होणार असलेल्या अंतिम लढतीत रजतसमोर डेन्मार्कच्या स्टीफन हॅन्सेनचे आव्हान असणार आहे.
लक्ष्मीराणी माझीच्या रूपात भारताला दुसऱ्या पदकाची आशा आहे. भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. लक्ष्मीराणीने जॉर्जिआच्या क्रिस्तिन इस्युबावर मात केली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिने मेक्सिकोच्या अलेक्झांड्रा व्हॅलेन्सिआवर ९-८ असा निसटता विजय मिळवला. उपान्त्य फेरीत तैपेईच्या शिह चिआ लिनने लक्ष्मीराणीला ६-४ असे नमवले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2015 1:04 am