भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षकपद टिकवणे संजय बांगर यांना कठीण जाणार असल्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर फलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी झिम्बाब्वेचे प्रशिक्षक लालचंद राजपूत, माजी कसोटी सलामीवीर विक्रम राठोड, अमेरिकेचे फलंदाजीचे प्रशिक्षक प्रवीण अमरे, माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार आणि शितांशू कोटक हे मातब्बर मार्गदर्शक शर्यतीत आहेत.

साहाय्यक मार्गदर्शकांच्या तीन जागांसाठी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुलाखतीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद मिळवण्यात अपयशी ठरलेले ५७ वर्षीय राजपूत सोमवारी साहाय्यक मार्गदर्शक पदांसाठीच्या मुलाखतीसाठी शर्यतीत होते. याशिवाय भारताचा माजी फलंदाज हृषिकेश कानिटकर आणि दिल्लीचा माजी फलंदाज मिथुन मन्हास यांनीसुद्धा मुलाखती दिल्या.

मुख्य प्रशिक्षकपदावर रवी शास्त्री यांचीच पुन्हा वर्णी लागल्यामुळे गोलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदांवर अनुक्रमे भरत अरुण आणि आर. श्रीधर कायम राहण्याची दाट शक्यता आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षकपदांच्या मुलाखती गुरुवापर्यंत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

सध्याचे साहाय्यक मार्गदर्शक बांगर, अरुण आणि श्रीधर यांच्यासह प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रह्मण्यम यांना वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकांच्या पार्श्वभूमीवर ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर बांगर पद गमावणार अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात आहे. बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ २०१४पासून ५० कसोटी आणि ११९ एकदिवसीय सामने खेळला आहे.

गोलंदाजीच्या प्रशिक्षकपदासाठी माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, पारस म्हांब्रे आणि अमित भंडारी यांनी मुलाखती दिल्या. गेल्या आठवडय़ात कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदासाठी निवड केली.