नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेला रवाना होणाऱ्या खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कर्तव्य आणि जबाबदारीचे भान राखावे. मैदानावर आणि मैदानाबाहेरदेखील आपल्या वर्तनाबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी शुभेच्छा सोहळ्यात केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताकडून तब्बल ८०० जणांचे पथक जकार्ताला रवाना होणार आहे. त्यात ५७२ खेळाडूंसह व्यवस्थापक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ‘‘इतक्या मोठय़ा प्रमाणात भारतीय खेळाडू आशियाईसाठी पात्र ठरले ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. जेव्हा तुम्ही तिथे दाखल व्हाल, तेव्हा तिथे तुमची ओळख वैयक्तिक नावाने नसून एक भारतीय ही आहे, हे सतत लक्षात ठेवावे. ही एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही मैदानावर आणि मैदानाबाहेर कोणतेही वर्तन करताना तुम्ही शंभर कोटींच्या देशाचे प्रतिनिधित्व करता, हे सतत ध्यानी ठेवा,’’ असे राठोड यांनी नमूद केले. या सोहळ्याप्रसंगी आयओए अध्यक्ष नरेंद्र बात्रा, सरचिटणीस राजीव मेहता, ब्रिजभूषणसिंह शरण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुम्ही अनेक वर्षांपासून मेहनत घेत असून पदक पटकावण्याचे स्वप्न साकार करण्याची वेळ आली आहे. आत्मविश्वास कायम ठेवा, परिणामाची धास्ती बाळगू नका.भारतीय खेळाडू गत आशियाई स्पर्धेपेक्षा उज्ज्वल कामगिरी करून अधिक पदके मिळवतील, असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला.