भारतीय पथकप्रमुख राकेश गुप्ता यांची ग्वाही; जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी होणार

ब्राझीलमधील झिका रोगाच्या प्रादुर्भावामुळे जगातील अनेक नामवंत खेळाडू आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून माघार घेत असले, तरी भारतीय खेळाडूंची योग्य रीतीने काळजी घेतली जाईल, असे भारतीय पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी सांगितले.

‘‘जागतिक आरोग्य महासंघाकडून सहभागी प्रत्येक देशाच्या ऑलिम्पिक महासंघाकडे या रोगाबाबत सविस्तर माहिती आली आहे. या रोगाबरोबरच अन्य काही रोगांपासून कसा बचाव करायचा याबाबतही मार्गदर्शक सूचना आल्या आहेत,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘ही माहिती आम्ही देशातील सर्व खेळांच्या राष्ट्रीय संघटनांकडे पाठवली आहे. आम्ही प्रत्येक खेळाडूंना रोगप्रतिबंधक औषधे देणार आहोत. तसेच प्रत्येक खेळाडूला पूर्ण बाह्य़ांचा टी शर्ट देणार आहोत. अद्याप कोणत्याही खेळाडूकडून या संदर्भात तक्रार आलेली नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंचा तेथील सहभाग सुसह्य़ होईल, अशी मला आशा आहे.’’

गोल्फमधील जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू जेसन डे याने झिका रोगाच्या कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली आहे. गोल्फमधील अ‍ॅडम स्कॉट, लुइस ओस्थुझिन, चार्ल श्वार्तेझेल, ग्रॅहॅम मॅकडोवेल, विजय सिंग, रॉरी मॅकलोराय यांनी यापूर्वीच या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तिजॉय व्हान गार्डरेन (सायकलिंग), स्टीफन क्युरी (बास्केटबॉल) या अमेरिकन खेळाडूंनीही स्पर्धेकडे पाठ फिरविली आहे.

‘‘रिओ येथील स्पर्धेत गतवेळच्या स्पर्धेपेक्षा यंदा पदकांमध्ये दुपटीने वाढ होईल. सायना नेहवाल (बॅडमिंटन), जितू राय (नेमबाजी), विकास कृष्णन (बॉक्सिंग) यांच्याबरोबरच टेनिस दुहेरी, तिरंदाजी, कुस्ती, भारतीय पुरुष हॉकी संघाकडूनही पदकांची अपेक्षा आहे. किमान दहा पदकांची आम्ही कमाई करू,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘आतापर्यंत शंभर खेळाडूंनी या स्पर्धेची पात्रता पूर्ण केली आहे. त्यामध्ये आणखी १५ ते २० खेळाडूंची भर होईल. गोल्फ, जलतरण व अ‍ॅथलेटिक्स या खेळात आणखी खेळाडू पात्रता निकष पूर्ण करतील अशी मला खात्री आहे.’’

कुस्तीमध्ये सुशील कुमार व नरसिंग यादव या खेळांडूपैकी नरसिंगला भारतीय कुस्ती महासंघाने ऑलिम्पिकला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत ऑलिम्पिक कांस्य व रौप्यपदक विजेता सुशील कुमार याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच अनेक टीकाकारांनीही कुस्ती संघटकांना लक्ष्य केले आहे. त्याबाबत विचारले असता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले, ‘‘कोणत्या मल्लास पाठवायचे याचा सर्वस्वी अधिकार कुस्ती महासंघास आहे. आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. बॉक्सिंगची राष्ट्रीय संघटना कार्यरत नसली तरी भारतीय खेळाडू राष्ट्रीय ध्वजाखालीच उतरणार आहेत.’’

‘‘सिनेअभिनेता सलमान खानने नुकतीच बलात्कार या शब्दावरून अवमानकारक भाषा केली होती. असे असले तरी भारतीय ऑलिम्पिक पथकाचा सदिच्छादूत म्हणून तोच राहणार आहे,’’ असेही मेहता यांनी सांगितले.