नवी दिल्ली : तमिळनाडूची सी. कवी रक्षना आणि राजस्थानचा दिव्यांश सिंह पनवार यांनी राष्ट्रीय नेमबाजी सराव स्पर्धेतील अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकाराचे जेतेपद संपादन केले.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली एलाव्हेनिल वालारिवान तसेच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवणारी अपूर्वी चंडेला तसेच अंजूम मुदगिल यांचा समावेश असतानाही कनिष्ठ गटातून वर आलेल्या कवी रक्षना हिने या सर्वावर मात करत जेतेपद पटकावले. रक्षना हिने अंतिम फेरीत २५१.४ गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. राजस्थानच्या निशा कनवार हिला २५०.७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या एलाव्हेनिल हिने तिसरे स्थान प्राप्त केले.

पुरुषांमध्ये, पंजाबच्या अर्जुन बबुता याने पात्रता फेरीत ६३२.१ गुणांसह अग्रस्थान पटकावले होते. पण पनवारने अंतिम फेरीत वर्चस्व गाजवले. त्याने २५०.९ गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याने २४९.७ गुणांसह रौप्यपदक मिळवले.

टी-२ स्किट प्रकारात हरयाणाची रैझा ढिल्लोन आणि पंजाबचा अमरिंदर सिंग यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत रैझाने ६० पैकी ५० वेळा अचूक वेध घेतला. पुरुषांमध्ये अमरिंदर आणि फतेहबिर सिंग शेरगिल यांनी ५४ वेळा वेध घेतला. पण अमरिंदरने शूट-ऑफमध्ये २-० अशी बाजी मारली.