|| प्रशांत केणी

प्रशिक्षक राम मेहेर सिंग यांचे स्पष्टीकरण

विश्वचषक, दुबई मास्टर्स आणि आशियाई अजिंक्यपद अशा सर्वच आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धामध्ये भारताचे वर्चस्व दिसून आले होते. फक्त आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. याचा अर्थ असा नाही की भारतीय संघ दुबळा होता, असे स्पष्टीकरण भारताचे प्रशिक्षक राम मेहेर सिंग यांनी दिले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंतची सलग सात सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताच्या पुरुष संघाला यंदा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारताच्या कामगिरीचे विश्लेषण करताना राम मेहेर सिंग म्हणाले, ‘‘कोणत्याही खेळात विजय-पराजय असतोच. खेळ, राजकारण आणि व्यवसाय या प्रत्येक ठिकाणी हे चढउतार पाहायला मिळतात. भारताने काही महिन्यांपूर्वीच इराणला हरवून आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. इराणमधील त्या स्पर्धेत भारताने सर्वच विजय एकतर्फी मिळवले होते. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला जेतेपद टिकवता आले नाही. भारतीय संघ कमजोर असता, तर संघाची कामगिरी नेहमीच वाईट झाली असती.’’

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पराभव आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार निवड प्रक्रियेचा सामना होणार होता, याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘याबाबत मी न बोललेच बरे. खेळाडूंची काय चूक आहे. संघनिवड योग्य पद्धतीने झाली. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. दुर्दैवाने आम्ही हरलो. पण आता तो सामना खेळून काय साध्य करायचे होते. आम्ही जकार्ताला जाण्याआधीच संघाला थांबवायला हवे होते. त्याच वेळी सामना खेळायला हवा होता.’’

सर्व संघांच्या लक्ष्यस्थानी फक्त पाटणाच!

‘‘आम्ही तीन वेळा सलग प्रो कबड्डीचे विजेतेपद पटकावले असल्याने सर्वाच्या लक्ष्यस्थानी आमचाच संघ आहे. त्यामुळे आमच्यासाठी आव्हान वाढले आहे. पाटणा पायरेटसला विजेतेपद मिळवून न देणे, हाच उर्वरित ११ संघांचा हेतू आहे,’’ असे राम मेहेर यांनी प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामाविषयी सांगितले. यंदाच्या हंगामात मोनू गोयत पाटण्याच्या संघात नाही, त्यामुळे प्रदीप नरवालवरील दडपण वाढले आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘आमच्या संघाची मदार फक्त प्रदीपवरच नाही. यंदा आणखी काही उत्तम चढाईपटू संघात आहेत.’’