15 January 2021

News Flash

रमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

तेजस्विनी आणि हीना दोघींनीही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते

| September 26, 2018 05:00 am

राहुल, तेजस्विनी, पृथ्वी, रिशांक विविध पुरस्कारांचे मानकरी

मुंबई : वर्षभर सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करून संपूर्ण देशाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या मुंबई आणि पुण्याच्या खेळाडूंना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळाले आहे. यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारे व नेमबाज तेजस्विनी सावंत, १९ वर्षांखालील विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि कबड्डीतील महाराष्ट्राचा उगवता तारा रिशांक देवाडिगा यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएम) पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. तर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे एसजेएएमने निवेदनात म्हटले आहे.

एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्ये ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या पुण्याच्या राहुलची ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट खेळाडू’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर पुण्याच्याच तेजस्विनी आणि मुंबईच्या हीना सिधू या दोघींची ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट महिला’ खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. तेजस्विनी आणि हीना दोघींनीही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, तर हीनाने आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्यपदकाची कमाई केली होती.

मार्च महिन्यात न्यूझीलंडला झालेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात पृथ्वीचा मोलाचा वाटा होता. त्यामुळेच त्याची वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू या बहुमानासाठी निवड झाली आहे, तर असंख्य आव्हानांचा सामना करत कबड्डीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रिशांकला भारतीय क्रीडा प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

आचरेकर यांनी सचिनसारखा अनमोल रत्न भारताला दिला. त्याशिवाय अनेक उदयोन्मुख खेळाडूंना घडवण्यात त्यांचा मोलाचा हातभार आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांच्या या कामगिरीचे कौतुक म्हणूनच एमजेएएमने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले आहे. याशिवाय माजी ऑलिम्पिक खेळाडू एस.एस. बाबू नारायण (फुटबॉल), मेरी डिसोजा (अ‍ॅथलेटिक्स) आणि मुरलीकांत पेटकर (पॅरालम्पिक) यांचीसुद्धा जीवनगौरव पुरस्कारासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीद्वारे प्रायोजकत्व केला जाणारा हा पुरस्कार सोहळा ऑक्टोबर महिन्यात संपन्न होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 5:00 am

Web Title: ramakant achrekar gets lifetime achievement award
Next Stories
1 Asia Cup 2018 : २३ महिन्यांनंतर धोनीला मिळालं कर्णधारपद पण…
2 मेसी, रोनाल्डोवर मॉडरीचची मात!
3 भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : भारतीय महिला संघाचा मालिका विजय
Just Now!
X