चॅम्पियन्स करंडकातील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचं भूत काही केल्या भारतीय संघाच्या मानेवरुन उतरण्याचं नाव घेत नाहीये. भारताच्या पराभवाची चौकशी करण्याची मागणी क्रिकेट चाहत्यांकडून होत होती, मात्र आता खुद्द केंद्र सरकारमधल्या मंत्र्याने या पराभवाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या भारतीय संघाच्या पराभवाची चौकशी करणं गरजेचं असल्याचं म्हणलंय. ते शुक्रवारी गुजरातमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी १८ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्याची चौकशी करण्याची मागणी केली.

चॅम्पियन्स करंडकातील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला सहजपणे हरवले होते. मग अंतिम सामन्यात भारताचा इतका ताकदवान संघ कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानकडून पराभूत कसा काय होऊ शकतो, असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला. त्यामुळे या सगळ्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे आठवले यांनी सांगितले. आठवलेंआधी पाकिस्तानी खेळाडू आमिर सोहलनेही पाकिस्तानचा संघ फिक्सींग करुन अंतिम फेरीत पोहचल्याची टीका केली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा करत सोहेलने सामन्याआधी मोठी खळबळ उडवून दिली होती.

चॅम्पियन्स करंडकाच्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यातही भारत पाकिस्तानवर मात करेली अशी सर्वांना आशा होती. मात्र पाकिस्तानने भारताला धक्का देत चॅम्पियन्स करंडक आपल्या नावे केला होता. या पराभवानंतर भारतीय चाहत्यांनी संघाच्या खेळाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती.